– एनबीएसएसएलयुपीचा 47 वा स्थापना दिवस 1 सप्टेंबर रोजी साजरा होणार
नागपूर :- भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर यांच्या अखत्यारित असणाऱ्या नागपूरच्या अमरावती रोड स्थित नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग एनबीएसएसएलयुपी या संस्थेद्वारे महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाच्या अंतर्गत 17 जिल्ह्यातील 5,000 गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल मृदा संशोधन केले जात असून त्याप्रमाणे पीक लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत देखील झारखंड, बिहार, अंदमान सह अनेक राज्यांना कृषी विषयक मार्गदर्शक दिले जात आहे.
संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून ‘भूमी’ या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे रासायनिक त्याचप्रमाणे भौतिक परीक्षण देखील पाहणे शक्य होणार असल्याची माहिती एनबीएसएसएलयुपीचे संचालक डॉ. नितीन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी : दूरसंवेदन उपयोजन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. जी. पी. ओवीरेड्डी मृदा संसाधन अभ्यास केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रमोद तिवारी, डॉ. उमाकांत मोर्या, भूमी नियोजन विभागाचे वैज्ञानिक डॉ. एच बिस्वास प्रामुख्याने उपस्थित होते.
एनबीएसएसएलयुपी या संस्थेचा 47 वा स्थापना दिवस 1 सप्टेंबर रोजी साजरा होणार असून याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ . एस के चौधरी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ माफ्सूचे कुलगुरू डॉ . नितीन पाटील आणि गडचिरोली पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
एनबीएसएसएलयुपी ही संस्था गेल्या 46 वर्षापासून भारतातील भूसंपत्तीची माहिती संकलित करून असून त्याचे दस्तऐवजीकरण करत आहे. या संस्थेचे बंगळुरू, कोलकता, जोरहाट, नवी दिल्ली, उदयपूर येथे प्रादेशिक केंद्र असून या संस्थेचे मुख्यालय हे नागपुरात आहे.