संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– डेंग्यू नियंत्रणासाठी येरखेड्यात अवतरले आरोग्य चमू
कामठी :- कामठी तालुक्यात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळुन येत असून डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी डेंग्यूसदृश्य परिस्थतीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी आज येरखेडा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित डेंग्यू नियंत्रण आढावा बैठकीत बोलत होते.तर या डेंग्यूसदृश्य परिस्थितीच्या नियंत्रणासाठी आज येरखेड्यात आरोग्य विभागाची चमू अवतरली यावेळी गावात युद्धपातळीवर आरोग्य चमू घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी करण्यावर भर देण्यात आला.
या आढावा बैठकीला पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,बीडीओ प्रदीप गायगोले,येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी, उपसरपंच, ग्रा प सदस्य ,आशा वर्कर,आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती दिशा चनकापुरे यांनी सांगितले की डेंग्यू आजाराबाबत लोकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना,योग्य आहार, व्यायाम ,आराम व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर केल्यास निश्चितच डेंग्यू आजारावर मात करता येऊ शकतो,पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यूची लागण व प्रसार रोखण्यासाठी सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर यांनी सांगितले की डेंग्यू हा आजार किटकजन्य आजार असून तो विषाणू पसरत असतो, डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासांपासून होत असतो हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असतो या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असून आपल्या घरातील कुंड्या ,रिकामे टायर ,फ्रीज च्या मागे घरातील छतावर पाणी 7 दिवसापेक्षा जास्त पाणी साचणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे मार्गदर्शीत केले. तसेच डेंग्यूमध्ये एकाकी ताप येणे, डोकेदुखी,डोळ्यांच्या खोबणीत वेदना,सांधेदुखी,सर्वांग दुखणे,अंगावर पुरळ येणे,पोट दुखणे, भूक मंदावणे,उलट्या होणे,प्रसंगी उलट्यातुन रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे ,नाकातोंडातून हिरड्यातून रक्तस्त्राव होणे,रक्त मिश्रित काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत असे लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्ततपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावा तसेच डेंग्यू आजाराला टाळण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामे करून स्वच्छ पुसून कोरडी करावी.जुने टायर ,नारळाचे टरफल,प्लास्टिकच्या वस्तू,पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या अशा निरुपयोगी वस्तू घरासमोर साठू देऊ नका,घरातील फुलदाण्या ,कुलर, फ्रीज यामध्ये साचलेले पाणी दर 2 ते 3 दिवसांनी काढावे असे विविध मार्गदर्शन या बैठकीतुन केले.