– हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्ट्रॉय मशीन, व्हिल चेअर व अनेक सुविधा
नागपूर :- ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उत्तर नागपुरातील सुगत नगर पाण्याच्या टाकीजवळ रिंगरोड वरील मनपाच्या ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ सोमवारी (ता.२१) सायंकाळी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी आशीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता अजय पाझारे, उपअभियंता डी.एम. भोवते, वयजंती आडे, कनिष्ठ अभियंता मनोज रंगारी, अरुण पेठेवार, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, माजी नगरसेविका नेहा निकोसे, राकेश निकोसे, नागपूर@2025 चे मल्हार देशपांडे, स्वच्छतागृहाच्या संचालनाची जबाबदारी स्वीकारलेल्या श्रीमो कंस्ट्रक्शनचे राजीव चौधरी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक मनपातील निवृत्त कनिष्ठ अभियंता योगेंद्र रामटेके, ज्येष्ठ नागरिक के.डी. मिश्रा, सुरिंदर मोहन सिंग आदी उपस्थित होते.
स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच डिस्ट्रॉय मशीन, हँड ड्रायर, लहान मुलांकरिता स्वतंत्र व्यवस्था, सेन्सर प्रणालीयुक्त दरवाजे अशा अनेक सुविधांनी सज्ज असे ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आले आहे. स्वच्छतागृहामधील सॅनिटर पॅड वेंडिंग मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकून एक पॅड मिळविता येते. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्याकरिता येथे सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉय मशीन देखील लावलेले आहे. हँड ड्रायर, वॉश बेसिनची महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे.
पुरूषांच्या स्वच्छतागृहामध्ये सहा लघुशंकागृह (युरिनल), कमोड व साधे असे तीन शौचालय, लहान मुलांकरिता एक शौचालय, दिव्यांगांकरिता स्वतंत्र कमोड शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन स्नानगृहांची देखील यामध्ये सुविधा आहे. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहामध्ये व्हिल चेअरची व्यवस्था आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर हिरवळ करण्यात आली तसेच झाडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. परिसरातील मनपाच्या या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये लघुशंकागृहाचा वापर नि:शुल्क असून शौचालयाच्या वापरासाठी, थंड पाण्याने आंघोळीसाठी आणि गरम पाण्याने आंघोळीसाठी शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. स्मार्ट पब्लिक टॉयलेटची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणा-या कर्मचा-यासाठी खोली तयार करण्यात आलेली आहे.
नागपूर शहरामध्ये एकूण चार स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. यापैकी गोकुळपेठ, बुधवार बाजार आणि सुगत नगर येथील स्वच्छतागृह नागरिकांच्या सुविधेसाठी खुले करण्यात आले आहेत. तर कळमना येथील स्वच्छतागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, गोकुळपेठ, बुधवार बाजार आणि सुगतनगर येथील स्वच्छतागृहांचा कायापालट करून येथे स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात आले आहेत. तर कळमना येथे पूर्णत: नवीन बांधकाम करून स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात येणार आहे.
नागपूर शहरामध्ये आणखी स्मार्ट स्वच्छतागृहांची निर्मिती व्हावी याकरिता मनपाद्वारे शासनाला सात स्मार्ट स्वच्छता गृहांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) पाठविण्यात आलेला आहे. फुटाळा, मानकापूर, मंगळवारी बाजार, रहाटे कॉलनी चौकातील गोरक्षण सभा जवळ, पारडी दहन घाटाजवळ, गांधीबाग कपडा बाजार आणि सतरंजीपुरा येथील मनपाचे जुने कार्यालय या सात ठिकाणी स्मार्ट पब्लीक टॉयलेट प्रस्तावित आहेत. या सात ठिकाणी तयार होणा-या स्मार्ट स्वच्छतागृहांमध्ये एकूण ८४ शौचालय, २५ बाथरूम, ७९ लघुशंकागृह, ७ हिरकणी कक्ष, ७ देखरेख कर्मचारी खोल्या आणि १४ दुकाने प्रस्तावित आहेत.