– सर्वसामान्यांची सोय : मध्य रेल्वेने जारी केली अधिसूचना
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील स्लिपर कोचची संख्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची यामुळे विशेष सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने यासंदर्भात डब्यांची नवीन स्थिती एका अधिसूचनेद्वारे जारी केली आहे. २२ नोव्हेंबरला नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या (गाडी क्र. १२२९०) आणि २३ नोव्हेंबरला मुंबईहून नागपूरला येणाऱ्या (गाडी क्र. १२२८९) दुरांतोमध्ये कोचची संख्या वाढलेली असणार आहे. सध्या नागपूर-मुंबई दुरांतोमध्ये २३ कोच असून यात थ्री टायरचे १५ आणि स्लीपरचे २ कोच आहेत. तर सेकंड एसीचे ३ व फर्स्ट क्लासचा एक कोच अशी स्थिती आहे. या गाडीने प्रवास सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात, ही गोष्ट लक्षात घेऊन स्लीपर कोचची संख्या वाढायला हवी, यासंदर्भात ना. नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहीले. पूर्वी या गाडीला ८ स्लीपर कोच होते आणि ९ थर्ड एसीचे कोच होते. पण मध्य रेल्वेने स्लीपर कोचचे ६ कोच कमी केले. त्यामुळे या गाडीमध्ये केवळ दोनच स्लीपर कोच राहिले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर थर्ड एसीच्या डब्यांची संख्या सहाने वाढविले. त्यामुळे २ स्लीपर कोच आणि १५ थर्ड एसीचे कोच अशी स्थिती झाली. परिणामी या गाडीने प्रवास करणे सर्वसामान्यांना महागात पडत आहे, ही बाब ना. गडकरी यांनी पत्राद्वारे रेल्वे मंत्र्यांच्या ध्यानात आणून दिली. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांनी ना. गडकरी यांना पत्रही लिहीले होते. २२ नोव्हेंबरपासून नागपूर-मुंबई व मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील सुधारित कोच पोझिशनच्या संदर्भात मध्य रेल्वेने १७ ऑगस्टला अधिसूचना काढली आहे. ना. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे अत्यंत गर्दीच्या या रेल्वे मार्गावरील प्रवास सुकर होणार आहे.