मुंबई :- मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 19 जुलै रोजी विधानपरिषदेत मांडलेला प्रस्ताव आज एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
विधानपरिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा भाग होता. या भागावर निजामाची राजवट होती. मराठवाडा भारतात विलीन होण्यासाठी अनेक हुतात्मे, स्वातंत्र्यसेनानी यांनी कार्य केले आहे. या स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान मोठे होते. दगडाबाई शेळके, गोदावरी किसनराव टेके यांच्यासह अनेक महिला स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात आपले योगदान दिले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाने देशाला दिशा देण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सुरेश धस, राजेश राठोड, विक्रम काळे, अरुण लाड, महादेव जानकर यांनी प्रस्तावावर आपले विचार मांडले.