‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

– मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव अभिवादन प्रस्ताव

मुंबई :- मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत मांडला त्यावेळी ते बोलत होते.

स्मृती स्मारक उभारणार

मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे कार्यक्रम मराठवाड्यात उत्साहाने साजरे केले जाणार असून यासाठी चार कोटी रुपये निधी देत आहोत तसेच जिल्हा नियोजनामधून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देत असल्याचेही सांगितले. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे एक अतिशय सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपये निधीला आम्ही मंजुरी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, निजामाच्या अत्याचारी राजवटी विरुध्द मराठवाडा आतून धगधगत होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनता हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तीव्र संघर्ष करीत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोक जागृती मूळ धरत होती. लोकमान्य टिळकांनी इ. स. १८९१ मध्ये जिनिंग मिल सुरु केली आणि त्यातून राजकीय जागृतीचे पहिले पाऊल मराठवाड्यात पडले. स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जागृतीचे कार्य केले. शारदा मंदिर शाळेमुळे मराठवाड्यात मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, १९९४ मध्ये हैद्राबाद प्रांतात दक्षिण साहित्य संघाची स्थापना झाली. केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांनी यात पुढाकार घेतला. साहित्य संघामुळे अनेक मराठी तरुण एकत्र आलेत. १९३१ मध्ये डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हैद्राबादमध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले तर आ. कृ. वाघमारे यांनी १९३७ मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना केली. या सर्वांमधून मराठवाड्यात सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ मूळ धरू लागली आणि त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीची बीजे पेरली गेलीत, असेही ते म्हणाले.

स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व

मराठवाडा मुक्तीसंग्रामात महाराष्ट्र परिषदेप्रमाणेच आर्य समाजाने मोठा वाटा उचलला आहे याविषयी मुख्यमंत्र्यांनी भाषणात उल्लेख केला. ‘वंदे मातरम्’ विद्यार्थी चळवळीतून मराठवाडा मुक्ती संग्राम लढयास बळ मिळाले. त्यामुळे तरुण वर्ग निजामाच्या जुलमी राजवटीविरुध्द एकवटला. पुढे १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे तीव्र पडसाद मराठवाड्यात उमटले.

स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सुर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अजरामर केला आहे. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुध्द पोलीस कारवाई सुरु केली. पोलीस कारवाई सुरु होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैद्राबाद संस्थानावर ताबा मिळविला असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विकासाच्या प्रकल्पांना वेग दिला

संतांच्या या भूमीत राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत मोठी आणि महत्वाची व्यक्तिमत्वे उदयाला आली., जसे की माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण. त्यांनी केवळ मराठवाड्याच्या नव्हे तर राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात उद्योग, विकास, सिंचन आणि कृषी या क्षेत्रातील विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आणि खऱ्या अर्थाने मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करता आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा भौगोलिकदृष्ट्या दूर असला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात मराठवाड्यात सुरू झाल्यानंतर मराठवाड्याशी संबंध येऊ लागला, ती आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

मराठवाड्याने घामाचे सिंचन केले

सहा वर्षांपूर्वी दुष्काळामुळे मराठवाड्यातून काही कुटुंबाना घरदार सोडावे लागले होते, ती आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. ते म्हणाले की, उपजीविकेसाठी ठाण्यात आलेल्या ४०० दुष्काळग्रस्तांना आम्ही निवाऱ्याची आणि उदरनिर्वाहाची सोय केली होती. त्या काळातही मराठवाड्यात फिरताना दुष्काळाची झळ कशी सोसावी लागते ते आपण सर्वांनी पाहिले आहे.

मराठवाडा हा कोकणसासारखा पावसाचा प्रदेश नाही. पश्चिम महाराष्ट्रासारखी सधनता नाही पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टाने या प्रदेशाला फुलविले आहे. आपल्या घामाचे सिंचन याठिकाणी केले आहे. संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक, संकटांवर मात करणारा शेतकरी, वाढणारे उद्योग हे सगळं या भूमीचे वैशिष्ट्य आहे.

शासन आपल्या दारी’ला भरघोस प्रतिसाद

अलिकडेच ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत मराठवाड्यात कार्यक्रम झाले तेव्हा या परिसरातील तरुणांचा, उद्योजकांचा बदललेला उत्साही चेहरा पहायला मिळाला. मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात झालेला हा सकारात्मक बदल मला समाधान देऊन गेला असेही मुख्यमंत्री म्हणाले. .

मराठवाड्याचे आणि राज्याचे काय अनेक प्रश्न आहेत, ते एका वर्षात संपणार नाहीत, असे सांगून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वस्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान 15 ऑगस्टपर्यंत वितरित करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Thu Jul 20 , 2023
मुंबई :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींना मंजुरी मिळण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आकाश फुंडकर, राजेश टोपे, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. रोजगार हमी योजना व फलोत्पादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!