‘कंत्राटदार बदलला तरी कंत्राटी कामगार बदलणार नाही’ याचा विसर
वीज केंद्रात परप्रांतीय कंपन्यांकडून स्थानिक कामगारांचा छळ
महानिर्मिती उपमुख्य (इंधन व्यवस्थापन) विद्युत भवन, नागपूर कार्यालयाचे दुर्लक्ष
भुषण चंद्रशेखर यांचेकडून मदतीचा हात
नागपूर :- परप्रांतीय कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे चार वर्षीय मुलीच्या कंत्राटी कामगार पित्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. न्याय मिळवून देण्यासाठी या कामगाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांचेकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
उपमुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन), विद्युत भवन, नागपूर यांचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ कार्यालय कोराडी वीज केंद्र येथे कार्यरत कंत्राटी कामगार तुळशीराम ईश्वर लाड या मराठी कामगाराला कामावरून काढण्यात आल्याचे पत्र क्र. ईयस/महाजनको/वॉश कोल/२०-२१/३९ दि. १४ एप्रिल २०२३ मे. इलिगंट सर्वेअर्स, हरियाणा या कंपनी प्रशासनाने काढून स्थानिक गावातील तुळशीराम ईश्वर लाड या मराठी कामगाराला एकाकी कामावरून काढून टाकले. तुळशीराम लाड यांची गेटपास ०४ जून २०२३ पर्यंत असूनही त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले.
आज एकाला कामावरून काढले उद्या आमच्या गावातील, घरातील प्रत्येक कामगाराला देखील एकाकी कामावरून काढले तर स्थानिकांच्या कुटुंबाचे काय? आम्ही खायचे काय आमच्यावर उपासमारीची वेळ येईल व आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल या धास्तीने स्थानिक कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. कंपनीने कामगारांविरुद्ध घेतलेले असे हूकुमशाही पद्धतीचे निर्णय मागे घेण्यात यावे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.
कामावरून कमी केल्याने कामगाराला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावे लागत आहे. बाहेरील राज्यातील कंपन्यांकडून आर्थिक स्वार्थापोटी स्थानिक मराठी कामगारांचे आर्थिक शोषण व पिळवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस महानिर्मिती वॉश कोल कामात वाढतच आहेत. जाणिवपुर्वक जास्त मोबदला घशात उतरविण्यासाठी कंत्राटदार कंपनीची ही खेळी आहे. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले. बाहेरील कंपन्या अरेरावीच्या भाषेचा वापर करून स्थानिक कामगारांची दमदाटी करतात. बाहेरील कंपन्यांची अशीच मनमानी सुरु असेल तर स्थानिक कामगारांमध्ये असंतोष पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणाकडे महानिर्मिती प्रशासनाने गांभीर्याने लक्षकेंद्रीत करून परप्रांतीय कंपनीवर कार्यवाही करावी, जेणेकरुन पीडित कामगारास तात्काळ न्याय मिळेल. उपमुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन) नागपूर यांचे कार्यक्षेत्रातील कामगारांचा आर्थिक छळ व पिळवणूक सुरुच आहे. या छळाला तात्काळ आळा घालून तुळशीराम ईश्वर लाड यांना कामावर पूर्ववत रुजू करावे.
जाणीवपूर्वक स्थानिक कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करण्याचे कटकारस्थान बाहेरील कंपन्यांकडून सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण चंद्रशेखर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते विधानसभा, महानिर्मिती अध्यक्ष तथा संचालक व मुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन), प्रकाशगड, बांद्रा, (पू) मुंबई यांना निवेदनातून विनंती केली आहे.