– मनपाची पोलिस, मूर्तिकार महासंघ, स्वयसंवी संस्थांसोबत बैठक
नागपूर :- यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर पूर्णत: बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होउ नये यादृष्टीने शहरात अशा मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे. याकरिता मनपाद्वारे शहरातील पारंपरिक मूर्तिकार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती गठीत करण्याचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला आहे.
प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विषयासंदर्भात शुक्रवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मनपाद्वारे पोलिस प्रशासन, शहरातील पारंपरिक मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक पोलिस आयुक्त नितीन जगताप, पोलिस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, विभागीय अधिकारी (स्वच्छता)रोहिदास राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी सर्वश्री रामभाउ तिडके, सुरेश खरे, दिनेश कलोडे, अजय मलीक, विठोबा रामटेके, भूषण गजभिये, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे सर्वश्री कौस्तभ चॅटर्जी, मेहुल कोसुरकर, इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंधडा, किंग कोबराचे अध्यक्ष अरविंदकुमार रजुडी, वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे, पारंपरिक मूर्तिकार संघटनेचे सर्वश्री सुरेश पाठक, चंदन प्रजापती, प्रकाश प्रजापती, स्वच्छ फाउंडेशनच्या अनसूया काळे-छाबरानी, रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे दिनेश नायडू, रोटरी मिहान टाउनचे अभय हरणे, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशनचे विशाल राउत आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर शहरात पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री आणि खरेदी यावर पूर्णत: बंदी असल्याचे यावेळी सांगितले. शहरामध्ये कुठेही पीओपी मूर्तींची निर्मिती अथवा खरेदी-विक्री होउ नये याकरिता आतापासूनच उपाययोजनात्मक दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. यादृष्टीने पोलिस प्रशासन, शहरातील पारंपरिक मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मनपाद्वारे कार्यवाही केली जाणार आहे. पीओपी मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून अशा मूर्ती शहरात येण्यापासून रोखण्याकरिता केंद्रीय समिती गठीत करण्यात येईल. या समितीमध्ये मनपा, पोलिस, महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींचा समावेश असेल. समितीमार्फत शहराच्या सीमेवरच शहरात दाखल होणा-या मूर्तींची तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.
याशिवाय शहरात मूर्तींची विक्री आणि खरेदी टाळण्यासाठी शहरात देखील पथक धडकपणे कार्यवाही करणार आहे. प्रत्येक झोनमध्ये मूर्तिकार बांधवांची नोंदणी केली जाईल. नोंदणीसाठी मूर्तिकारांना १० ते १५ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये मनपाद्वारे गठीत मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचे पथक नोंदणी अर्जांची छाणनी करेल व मूर्तिकाराच्या नोंदणीबाबत निर्णय घेईल. मूर्ती विक्रेत्यांकरिता देखील हिच प्रणाली वापरण्यात येणार असल्याचेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.
पीओपी मूर्ती प्रतिबंधाबाबत बैठकीमध्ये स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मूर्तिकार महासंघाच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या.