मंत्री मंडळ विस्तार आणि या पाच मंत्र्यांना वगळणार, अशी पुडी दिव्य मराठीने सोडली चुकून ती लोकांना खरी वाटली आणि या बातमीचा बऱ्यापैकी गाजावाजा होतोय बघताच लोकसत्ता सहित इतर अनेक वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी हि तद्दन मंत्रिमंडळ विस्तार आणि पाच मंत्र्यांना वगळण्याची बातमी उचलून धरली, एवढ्यावरच हि अशी थापाडी मीडिया थांबली नाही तर वगळण्यात येणाऱ्या तथाकथित पाच मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वर्षा बंगल्यावर बोलावून झाप झाप झापले हि अशी लोणकढी थाप देखील लबाड मीडिया मारून मोकळी झाली. इकडले तिकडले कान देऊन ऐकायचे आणि थापा मारून मोकळे व्हायचे हे राज्यातल्या मीडियाला नेहमीचेच झाले म्हणजे उद्या जर एखाद्याने, जयंत पाटलांना दिवस गेलेत, असे त्यांच्या कानात सांगितले तर आमची हि अशी बावळट मीडिया जयंत पाटलांच्या डोहाळे जेवणाचे देखील कौतुक करून मोकळे होईल.
जे मी सांगतो ते नेमके असते सत्य असते हे कायम लक्षात ठेवा म्हणजे यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या वागण्या बोलण्यावर नाराज होणार नाहीत आणि या अशा नाराजीचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटणार नाहीत हि अशी तंबी मात्र अगदी शंभर टक्के मुख्यमंत्र्यांनी खासदार श्रीकांत यांच्यासहित त्या साऱ्या मतलबी मंडळींना विशेषतः जाहिरात प्रकरणानंतर दिलेली आहे, असे वेडेवाकडे अजिबात वागू नका रागाने सांगितले आहे, अशी माझी पक्की माहिती आहे. दुसरा अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि आधीच्या दसरा मेळाव्यानिमित्ते एकनाथ शिंदे यांचे बीकेसी मधले फसलेले फ्लॉप ठरलेले वाया गेलेले अर्थहीन दिशाहीन भरकटलेले ते भाषण आणि त्यांचा एक वर्षांपूर्वी गोरेगाव मधल्या वेस्ट इन या पंचतारांकित हाटेलात उद्धवने केलेला जाहीर अपमान या दोन्हीची परतफेड या पठयाने 19 जुन रोजी त्यांच्या शिवसेनेचा जो स्थापना दिवस मेळावा गोरेगावच्या त्याच पंचतारांकित हॉटेलसमोर झाला, तेथे ती परतफेड करून मुख्यमंत्री मोकळे झाले. आईचे दूध विकणारे शिवसैनिक मला नकोत, या वाक्यातून उद्धव यांनी शिंदे यांचा अपमान केला होता आणि व्यथित नाराज निराश होऊन त्याच्या दुसरेच दिवशी शिंदे उद्धव यांना सोडून जे बाहेर पडले त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊनच त्यांना उद्धव यांना आपली खरी ताकद दाखवून दिली…
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 19 जून रोजी पार पडलेला मेळावा सर्वार्थाने खऱ्या अर्थाने फार मोठा यशस्वी ठरला विशेषतः एकनाथ यांच्या त्यादिवशीचा प्रगल्भ उत्कट तडफदार जोशपूर्ण व्यापक उत्स्फूर्त भाषणाची तारीफ स्तुती जगभरातल्या मराठींनी केली हे विशेष, एवढे शिंदे यांचे भाषण गाजले लोकांना भावले आवडले हृदयाला भिडले विशेष म्हणजे त्या भाषणामुळे राज्यातला मराठा सुखावला कारण त्यादिवशी त्यांना भविष्यातला एक भन्नाट लोकोपयोगी लोकमान्य लोकात सतत राहणार रमणारा धाडसी कामसू मराठा नेता एकनाथ शिंदे यांच्या रूपात गवसला आढळला. त्या भाषणातून शिंदे यांचे राज्यातले राजकीय महत्व वाढले आणि उद्धव ठाकरे यांचे महत्व व प्रभाव कमी झाला. बघा राजकारण कसे असते कसे फिरते ते म्हणजे शिंदे यांच्या गटातून आलेल्या केवळ एका फालतू जाहिरातीमुळे शिंदे अडचणीत येण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती तर त्याच शिंदे यांच्या केवळ एका चिंतनशील भाषणामुळे केवळ एकाच रात्रीतून त्यांच्यातील धाडसी नेतृत्वाचा जगभरतल्या मराठींना साक्षात्कार झाला. लक्षपूर्वक ऐका आणि वाचा मित्रांनो, 19 जून रोजीच्या पक्ष मेळाव्याच्या भव्य यशाचे शिल्पकार होते आयोजक होते स्वतः एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, एकनाथ यांचे जवळचे जिवलग ठाण्यातले नरेश म्हस्के, संजय मोरे आणि आणि आशिष कुलकर्णी…
आशिष कुलकर्णी या दिवसात भाजपात आहेत पण तरीही ते एकनाथ शिंदे यांच्या सभोवताली अवतीभोवती असतात कारण भाजपाने त्यांना शिंदे आणि फडणवीस म्हणजे शिंदे सेना आणि भाजपा या दोघातले समन्वयक म्हणून नेमलेले असल्याने भाजपाचे असूनही तुम्हाला ते अनेकदा वर्षा बंगल्यावर किंवा शिंदे सेनेच्या आसपास वावरतांना दिसले असतील. अत्यंत शॉकिंग बातमी अशी कि एकनाथ शिंदे यांचा 19 जूनचा पक्ष मेळावा आणि त्यानिमित्त त्यांचे भाषण असे दोन्ही प्रकार मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय व भव्य होण्याची आशिष जबाबदारी तुमची हे मोठ्या मनाच्या देवेंद्र फडणवीस यांनी कुलकर्णी यांना निक्षून सांगितले होते म्हणून देवेंद्र हे असे आगळेवेगळे व्यापक विचारांचे नेतृत्व आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातले प्रभावी मुद्दे, भाषणाची स्टाईल, टाळी वाक्ये, वाक्यरचना, वाक्यांची फेक, वाक्यांवर जोर या साऱ्याची अतिशय जय्यत तयारी खूप मेहनत घेऊन एकनाथ यांनी जशी केली तशी ती त्यांचाकडून जातीने आशिष कुलकर्णी यांनी करवून घेतलेली होती. पक्षाचा एक अत्योत्तम मेळावा कसा असू शकतो ते बुद्धिमान उत्साही खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यादिवशी दाखवून दिले. आशिष कुलकर्णी नेमके कोण आणि कसे त्यावर मी पुढल्या भागात तुम्हाला नक्की सांगणार आहे…
तूर्त एवढेच :
हेमंत जोशी