– स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेतर्फे शिबिर
नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क नेत्र व कर्णरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला जात आहे.
मोबाईल व्हॅनद्वारे नागपूर शहरातील विविध वस्त्यांमध्ये पोहोचून तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करीत आहे. या उपक्रमात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक नागरिकांचे डोळे व कान तपासण्यात आले. अनेकांना अत्यल्प दरात चष्माही देण्यात आला. या शिबिरात ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळला, अशांच्या डोळ्यांवर संस्थेच्या वतीने निःशुल्क शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. तसेच ज्यांना कर्णयंत्राची आवश्यकता आहे, त्यांनाही अतिशय कमी दरांमध्ये यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा उपक्रम विशेषतः शहरातील झोपडपट्ट्या तसेच गरीब वस्त्यांमध्ये राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि. १२ जून) रघुजीनगर सोमवारी क्वार्टर परिसरात निःशुल्क कर्ण व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला. संजय बनसोड, जयश्री खंडाळे यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. आतापर्यंत जुनी शुक्रवारी, तेलीपुरा, गायत्रीनगर झोपडपट्टी, कुंभारपुरा नंदनवन, लाभानतांडा गजानन चौक, सोमवारीपेठ मिरची बाजार, शिवाजी चौक, हिवरी नगर, वकीलपेठ, सुर्वे नगर झोपडपट्टी, सक्करदरा बॉलीवूड सेंटर पॉईंट (मजुरांसाठी), शिरसपेठ या ठिकाणी मोबाईल व्हॅन पोहोचली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निरामय नागपूर या संकल्पनेअंतर्गत शहर मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने हा पुढाकार घेतला असून, त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.