अभियान संयोजक आ. प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार यांची माहिती
मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे व कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यात या अभियानानिमित्त ४८ जाहीर सभा होणार असल्याची माहिती महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रदेश प्रवक्ता गणेश हाके ,राणी द्विवेदी यावेळी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले की, ३१ मे ते ३० जून असा सुमारे महिनाभर महाजनसंपर्क कार्यक्रम चालणार आहे. या दरम्यान देशभरात ५१ रॅली , ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील १ हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि बूथ स्तरावर आयोजित केले जाणार आहेत. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, २३ जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल रॅलीद्वारे देशभरातील १० लाख बूथवर पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि संपर्क साधतील.
भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले की,गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिल्यामुळे जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे. ‘अपना परिवार अपना विकास’ हे धोरण बदलून ‘सबका साथ, सबका विकास’चा नवा अध्याय रचला आहे. पूर्वी योजना , प्रकल्पांची केवळ घोषणा होत असे मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसे. आता पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही एकाच सरकारच्या कालावधीत होत आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा १०० टक्के लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहे.
शेलार यांनी सांगितले की, गेल्या ९ वर्षात सुमारे ४८ कोटी लोकांची जन-धन खाती उघडण्यात आली, उज्ज्वला योजनेंतर्गत ९.५ कोटी गॅस कनेक्शनचे वाटप, सुमारे ३.५ कोटी घरांना वीजपुरवठा, ११ कोटींहून अधिक शौचालयांचे बांधकाम, १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ ,सुमारे १२.५ कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा, अशी मोदी सरकारची गेल्या ९ वर्षांतील कामगिरी आहे.
राज्यात प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघांचे विभाग करण्यात आले असून या मतदारसंघांत राज्याचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी , उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव ,अनुराग ठाकूर, प्रल्हादसिंह पटेल,अजयकुमार मिश्रा, खा. तीरथसिंह रावत , सदानंद गौडा , मध्य प्रदेशचे मंत्री अरविंद भदुरीया आदी प्रवास करणार असल्याचेही आ. शेलार यांनी नमूद केले.
मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीची विस्तृत माहिती देण्यासाठी 9yearsofseva.bjp.org ही वेबसाइट सुरू केली असून जनसंपर्क आणि अभियानात सहभागी होण्यासाठी भाजपने ९०९०९०२०२४ हा मिस्ड कॉल नंबर देखील सुरु केल्याची माहिती देण्यात आली.