बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता

पुरवणी परीक्षेत यश संपादन करावे – दीपक केसरकर

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 14 लाख 28 हजार 194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 91.25 अशी आहे. तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 44.33 अशी आहे. नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 6113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील 5673 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 93.43 इतकी आहे, अशी माहिती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींचा निकाल ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी जास्त आहे.

शाखानिहाय निकाल

इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 96.09, कला शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी 84.05, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी 90.42 तर व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.25 इतकी आहे. तर एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 96.01 टक्के इतका असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.13 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 93.34, नागपूर विभागात 90.35, औरंगाबाद विभागात ९१.८५, कोल्हापूर विभागात ९३.२८, अमरावती विभागात 92.75, नाशिक विभागात ९१.६६ आणि लातूर विभागात 90.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ११९७ कोटी जिल्ह्यांना वितरित - सचिव सुमंत भांगे

Fri May 26 , 2023
मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ७५२ कोटी रुपये असा एकूण ११९७ कोटी रुपयेइतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना बुधवार २४ मे २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com