संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ११९७ कोटी जिल्ह्यांना वितरित – सचिव सुमंत भांगे

मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ७५२ कोटी रुपये असा एकूण ११९७ कोटी रुपयेइतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना बुधवार २४ मे २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला असून लाभार्थ्यांना तो तत्काळ वाटप करावा, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु, पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १०००/- दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करावे, अशा सूचनाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव भांगे यांनी दिल्या आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com