– तोंड, हातपाय बांधलेला फोटोही पाठविला
– सीताबर्डीतील हॉटेलमध्ये थांबला
– नोकरी लागल्याचे सांगून निघाला घरून
नागपूर :-ऑनलाईन जुगार खेळण्याच्या नादात जवळची संपूर्ण रक्कम संपल्यानंतर त्याने स्वतच्या अपहरणाची योजना आखली. वडिलांना दोन लाखांची मागणी केली. विश्वास बसावा म्हणून तोंड, हातपाय बांधलेला फोटोही पाठविला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र, कर्तव्यदक्ष लोहमार्ग पोलिसांनी हे प्रकरण बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आणले. जयपाल (21) असे त्या युवकाचे नाव आहे.
जयपालचे वडिल शेतकरी आहेत. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुली विवाहित आहेत. जयपाल पदविधर (बीए) आहे. नोकरीसाठी तो सतत प्रयत्नशील आहे. बरेच प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागली नाही. वडिलांना काय उत्तर द्यायचे म्हणून यावेळी त्याने वडिलांना आनंदाची बातमी दिली. रेल्वेत झेंडी दाखविण्याची नोकरी मिळाली असून प्रशिक्षणासाठी भोपाळला जात असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. वडिलांकडून पैसे घेतले आणि 8 एप्रिलला निघाला.
प्रशिक्षण संपले असून नागपुरात आल्याची माहिती त्याने वडिलांना दिली. सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबला. त्याला ऑन लाईन जुगार खेळण्याची सवय होती. जुगारात हरल्याने त्याच्या जवळील पैसे संपले. तसेच हॉटेलचे बिलही थकले. दरम्यान वडिलांनी त्याला दहा हजार रुपये ऑन लाईन पाठविले. तेही पैसे संपले. तो दररोज फोनवर वडिलांच्या संपर्कात रहायचा. परंतु 24 एप्रिलपासून फोन बंद केला. आता पैसे कुठून आणायचे. त्याने युक्ती लढविली आणि स्वतच्या अपहरणाची योजना आखली.
तोंड, हात पाय बांधलेला फोटो काढला आणि वडिलांच्या मोबाईलवर पाठविला. तुमच्या मुलाचे अपहरण झाले असून त्याला सोडविण्यासाठी एक लाख रुपये पाठवा, असा मॅसेज केला. नंतर दोन लाखांची मागणी केली. अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. संदेश मिळताच जयपालच्या वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला.
घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी एक पथक तयार केले. या पथकात एपीआय अश्विनी पाटील, पीएसआय ओमप्रकाश भलावी, पोलिस शिपाई प्रवीण खवसे यांचा समावेश होता. त्यांनी फोटोवरून रेल्वे स्टेशन परिसर तसेच शहरात शोध घेतला असता जयपाल हा झिरो माइल जवळील बीएसएनएल ऑफिसच्या मागे दडून बसलेला आढळून आला. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला अटकाव करून ताब्यात घेतले आणि ठाण्यात आणून पालकांच्या सुपूर्द केले.
@ फाईल फोटो