पुणे :- बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याची ग्वाही देतानाच विकसित भारताच्या उभारणीमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राने भरीव योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यानी आज पुण्याजवळील बालेवाडी इथे बोलताना केले.
राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कर्ज पुरवठादार वित्तीय संस्था त्याचबरोबर बांधकाम क्षेत्राशी संबंधित अन्य व्यावसायिकांच्या एक दिवसीय परिषदेत डॉ .कराड बोलत होते. राज्यभरातून सुमारे 250 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
कोरोना पश्चात काळात बांधकाम व्यावसायिकांसमोर विविध प्रकारची आव्हाने निर्माण झाली असून सध्याची कर रचना, अत्याधुनिक तंत्ज्ञानाचा वापर, कुशल मनुष्य बळाची कमतरता यासारखे अनेक प्रश्न असल्याचे विचार काही बांधकाम व्यावसायिक वक्त्यांनी मांडले, त्याचा उल्लेख करून डॉ .कराड यांनी तुमच्या सर्व समस्यांवर एकत्रित बसून चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा काढण्यास सरकार कटिबध्द असल्याचे सांगितले.
जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत असून 2047 पर्यंत म्हणजे आगामी 25 वर्षांच्या अमृत काळात विकसित आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे हे आपल्या सर्वांचे मुख्य ध्येय आहे, देशाच्या सकल उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा तिसरा क्रमांक असून या क्षेत्राने विकसिन भारत निर्मितीच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केले.