स्वच्छतेबाबत शहरातील महिला बचत गटांची क्षमता बांधणी, महिलांनी केला शहर स्वच्छतेचा निर्धार

नागपूर :- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण आणि व्यवस्थापनासंदर्भात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२१) शहरातील विविध महिला बचत गटांची क्षमता बांधणी बैठक घेण्यात आली.

महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन (टाउन हॉल) येथे आयोजित बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त गणेश राठोड, सहायक आयुक्त किरण बगडे, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, तेजस्विनी महिला मंचच्या अध्यक्ष स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर किरण मुंधडा, स्वच्छ असोसिएशनच्या अनुसूया काळे छाबरानी, कोल्हे, प्रमोद खोब्रागडे यांच्यासह २८ समूदाय संघटक, सीआरपी, वस्तीस्तर संघ आणि शहरस्तर संघाचे अध्यक्ष आदींची मोठी उपस्थिती होती.

शहर स्वच्छतेच्या कार्यात महिलांचे योगदान महत्वाचे असून या कार्यात सहभाग घेत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मनपाचे प्रयत्न असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यावेळी सांगितले. महिला बचत गटांमार्फत प्रत्येक घरातून कचरा विगल करून त्यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करण्याची संकल्पना जोशी यांनी मांडली. याशिवाय महिला बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती करून प्लास्टिक मुक्त शहर बनविण्यास योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वच्छतेच्या या कार्यात सहभागी बचत गटांना मनपाद्वारे योग्य मोबदला देण्यात येणार असल्याचे राम जोशी यांनी यावेळी सांगितले. नागपूर शहरात एकूण २५०० बचत गट असून त्यापैकी किमान २००० बचत गटांनी सुद्धा कचरा विलगीकरणासंदर्भात जनजागृती तथा प्रचार प्रसार करण्याची भूमिका बजावल्यास शहरातील घनकचरा व्यवस्थापन योग्य होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

कच-याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी त्याचे घरातच योग्य विलगीकरण होणे आवश्यक आहे. घराघरात ओला, सुखा यासोबतच प्लास्टिक, सेनेटेरी नॅपकिन्स, घातक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा असा सहा प्रकारचा कचरा वेगवेगळा संकलीत करण्याबाबत घराघरांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. याबाबत शहरातील महिला बचत गटांच्या सदस्या घरोघरी जाउन मार्गदर्शन करतील, असेही यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.

तेजस्विनी महिला मंचच्या अध्यक्ष स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर किरण मुंधडा आणि स्वच्छ असोसिएशनच्या अनुसूया काळे छाबरानी यांनी महिलांना स्वच्छतेबाबत विविध उदाहरणांसह माहिती देउन प्रोत्साहित केले.

स्वच्छोत्सवात महाराष्ट्राच्या स्वच्छतादूतांची हजेरी

स्वच्छ भारत मिशन-नागरी अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या स्वच्छोत्सवात महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूत महिलांच्या गटाने दिल्ली येथील हॅबीटॅट सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन- नागरीच्या अंतर्गत स्वच्छोत्सव उपक्रमात ‘आंतरराष्ट्रीय शुन्य कचरा दिवस’ (International day of Zero Waste) कार्यक्रमात उपस्थित झाला. यापूर्वी महिलांच्या या समुहाने दोन दिवस देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर येथे अभ्यास दौरा केला व कचरा विलगीकरण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील स्वच्छता दूत महिलांच्या गटाचे नेतृत्व करणा-या समाज विकास विभागाच्या दीनदयाल नागरी उपजीविका अभियानाच्या शहर व्यवस्थापक नूतन मोरे यांनी या अभ्यास दौ-यातील अनूभव यावेळी मांडले.

स्वच्छता दूत संगीता रामटेके सन्मानित

नागपूर महानगरपालिकतून स्वच्छता दूत संगीता रामटेके या स्वच्छोत्सव कार्यक्रमास उपस्थित होत्या. सावित्री बचत गटाच्या संगीता रामटेके या रोज १००० किलो सुका कचरा गोळा करतात व नागपूर महानगरपालिकेमार्फत संचालित कचरा संकलन केंद्रासोबतच स्वतःचे २ कचरा संकलन केंद्र चालवतात. संगीता रामटेके यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अतिरिक्त आयुक्तांसह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात स्वच्छता क्षेत्रात कार्य करणारी कंपनी केपीएमजी चे समन्वयक स्वप्नील अग्रवाल यांनीही महिलांना कचरा संकलन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया या साखळीतील बारकावे सांगत महिलांची भूमिका विषद केली.

कार्यक्रमाचे संचालन समाज विकास विभागाच्या दीनदयाल नागरी उपजीविका अभियानाच्या शहर व्यवस्थापक नूतन मोरे यांनी केले तर आभार शहर व्यवस्थापक विनय त्रिकोलवार यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी मो आबीद ताजी यांची नियुक्ती

Sat Apr 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष मो आबीद  ताजी यांची कांग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्ती बद्दल नवनियुक्त आबीद ताजी यांनी माजी मंत्री सुनील केदार,कांग्रेस चे नागपूर जिल्हा ग्रा अध्यक्ष राजेंद्र मुळक,कांग्रेस अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट् प्रदेश अध्यक्ष व आमदार डॉ वजाहत मिर्जा, यांचे आभार मानत पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचविण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com