मास्क न घातल्यास सक्त दंडात्मक कारवाई
मेयो, मेडिकलमध्ये फेस शिल्ड वापरा
मंगल कार्यालयात व्हीडीओ शुटींग अनिवार्य
लग्न, कार्यप्रसंगाची सूचना बंधनकारक
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोना बाधितांची रुग्ण संख्या दोन हजारावर गेली आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सायंकाळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपाधीक्षक प्रमोद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता बि.डी.सोनवणे, डॉ सागर पांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अनेक वरिष्ठ उपस्थित होते.
बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. अशाच पद्धतीचे रुग्ण वाढ सातत्याने असल्यास पुन्हा कडक निर्बंध लादले जातील. त्यामुळे बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मेयो, मेडिकल व अन्य वैद्यकीय यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व अन्य मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दोन मास्कसह फेस शील्ड वापरावे. रुग्णांची संख्या वाढत असताना कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक होणार नाही. यासाठी सर्व ती काळजी घ्यावी. तसेच या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर रुग्णांच्या नातेवाईकांवर देखील कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक सुरक्षा यंत्रणेला देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
मंगल कार्यालय सोबतच मोठ्या हॉटेल्समध्ये होणाऱ्या लग्नावरही करडी नजर ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यापुढे कोणतेही लग्न कार्यालय होत असेल तर त्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देणे अनिवार्य असेल. कोरोनाची लाट असतानाही लग्न कार्य व कार्यक्रम होत असतील तर त्याचे व्हिडिओ शूटिंग करणे आता मंगल कार्यालयाच्या मालकांना अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशासनाने पुरावा मागितल्यास ते सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही, याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com