रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

कर्मयोगी प्रारंभ प्रारुपाचा केला शुभारंभ- नवीन नियुक्तींसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम

नागपूर आणि पुण्यासह देशभरात 43 ठिकाणी उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, नोकरी मिळालेल्या उमेदवारांना पुण्यात नियुक्तीपत्रांचे वितरण

मुंबई :- रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

भारतातील 45 हून अधिक शहरांमध्ये 71,000 पेक्षा अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत, त्यामुळे इतक्या कुटुंबांसाठी आनंदाचे एक नवीन पर्व सुरू होईल असे या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने, धनत्रयोदशीच्या दिवशी 75,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. “केंद्र सरकार देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे, याचाच आजचा रोजगार मेळावा पुरावा आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

महिन्याभरापूर्वी रोजगार मेळाव्याला सुरुवात केल्याचे त्यांनी स्मरण करून देत, अनेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्ये वेळोवेळी अशा रोजगार मेळ्यांचे आयोजन करत राहतील असे ते म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली तसेच चंदीगड येथे हजारो तरुणांना तिथल्या सरकारांकडून नियुक्ती पत्रे देण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गोवा आणि त्रिपुरा देखील काही दिवसांतच अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करत आहेत असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या जबरदस्त कामगिरीचे श्रेय दुहेरी-इंजिन सरकारला दिले आणि भारतातील तरुणांना सक्षम करण्यासाठी वेळोवेळी असे रोजगार मेळावे आयोजित केले जातील, असे आश्वासन दिले.

तरुण हे देशाची सर्वात मोठी ताकद आहे, त्यांची प्रतिभा आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरण्यास केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे (लोकसेवकांचे) स्वागत आणि कौतुक केले. ते ही महत्त्वाची जबाबदारी अत्यंत विशेष काळात म्हणजे अमृत काळात स्वीकारत असल्याचे स्मरण पंतप्रधानांनी करुन दिले. अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या संकल्पातील त्यांची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका आणि कर्तव्ये सर्वसमावेशकपणे समजून घेतली पाहिजेत, कर्तव्ये पार पाडण्यासाठी क्षमता वाढवण्यावर सतत भर दिला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आज सुरू झालेल्या कर्मयोगी भारत तंत्रज्ञान मंचावर प्रकाश टाकताना, सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनेक ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेची पंतप्रधानांनी माहिती दिली. त्यांनी कर्मयोगी प्रारंभ या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमावर भर दिला आणि नवीन नियुक्त झालेल्यांना याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले. त्याचे फायदे सांगत, कौशल्य विकासासाठी हे एक उत्तम स्रोत ठरेल तसेच आगामी काळात त्यांचा फायदा होईल असे पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूरसह देशभरातल्या 43 ठिकाणी (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता) आज या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. पुण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते, केंद्र सरकारच्या विविध विभागात/संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या 213 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितलं की, आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. “देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रोजगार मेळावा सुरु केला आहे. या आधी, ऑक्टोबरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात, 75,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.” नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला आठवले यांनी दिला.

नागपूरच्या ग्रुप सेंटर केंद्रीय राखीव पोलीस दल– सीआरपीएफ हिंगणा येथे २०० उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले . सीआरपीएफ पश्चिम क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक रणदीप दत्ता ,ग्रुप सेंटरचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर , नागपूर क्षेत्राच्या टपाल महानिरिक्षक शुभा मधाळे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले . सीआरपीएफ , टपाल खाते , माईन्स , बॅकींग क्षेत्रातील नोकरी मिळवण्याऱ्या तब्बल २०० उमेदवारांना रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्ती मि नियुक्ती मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला .

पार्श्वभूमी

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मिती आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्यासाठी प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्‍टोबरमध्ये रोजगार मेळ्याअंतर्गत 75,000 नियुक्तीपत्रे नव्याने नियुक्ती झालेल्यांना देण्यात आली होती.

नव्याने नियुक्त झालेल्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रांची प्रत्यक्ष प्रत देशभरातील 45 स्थळांवर सुपूर्त करण्यात येईल (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता). यापूर्वी भरण्यात आलेली पदे वगळता, शिक्षक, व्याख्याता, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे देखील भरली जात आहेत. विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) गृह मंत्रालयाकडून लक्षणीय संख्येने पदे भरली जात आहेत.

पंतप्रधानांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्युलचा देखील शुभारंभ केला. हे मॉड्यूल, विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी संबंधित विभागाचा परिचय करून देणारा एक ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये सरकारी नोकर वर्गासाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणची नीतिमत्ता आणि सचोटी, मनुष्यबळ विकास धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश असेल, जे त्यांना धोरणांशी जुळवून घ्यायला आणि नवीन भूमिकांमध्ये सहजतेने संक्रमण करायला मदत करेल. igotkarmayogi.gov.in या व्यासपीठावर, त्यांना आपले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी इतर अभ्यासक्रम पाहण्याची आणि शिकण्याची संधी देखील मिळेल.

 

 

 

NewsToday24x7

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ग्रंथोत्सव या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत

Wed Nov 23 , 2022
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘ग्रंथोत्सव’ या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रामीण व शहरी भागातील […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com