मुंबई :- ज्येष्ठ समाजसेवक तथा सेवाभावी युवकांचे आयडॉल असणारे प्रा. राजाराम वट्टमवार सर यांच्या नावाने फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षणात हुशार असून आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, अशा पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या फेलोशिपचा फायदा होणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केंद्र आणि राज्याच्या बैठकीत प्रा. राजाराम वट्टमवार फेलोशिपच्या पोस्टरचे प्रकाशन करून शुभारंभ झाल्याची घोषणा ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या देशपातळीवरील संघटनेची दोन दिवसीय कार्यशाळा व चिंतन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी “प्रा. राजाराम वट्टमवार फेलोशिप” ची घोषणा करण्यात आली. प्रा. राजाराम वट्टमवार यांनी आयुष्यभर ज्ञानदानासाठी आपले आयुष्य वेचले. त्या वट्टमवार सरांना या निमित्ताने गुरू वंदन होणार आहे. ‘लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आयुष्य वेचायचे हेही निःस्वार्थीपणे’ हा मूलमंत्र, गुरुमंत्र प्रा. वट्टमवार यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना दिला आहे.
प्रा. राजाराम वट्टमवार यांची ओळख
मूळचे नांदेडचे असणारे प्रा. राजाराम वट्टमवार हे समाजशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात ज्ञानदान करत अनेक सेवाभावी कार्यासाठी योगदान दिले आहे. बाबा आमटे यांच्यासारख्या अनेक समाजकारण्यांशी त्यांचे संबंध होते. समाजकारण हा त्यांचा आवडता विषय आहे. अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते हिरीरीने काम केलेले आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यात त्यांचे विद्यार्थी आहेत. देशभरातील वाचन चळवळ वाढावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. एक संशोधक, उत्तम अभ्यासक, समाजकारणात काम करणाऱ्या अनेक मोठ्या व्यक्तींचे ते आदर्श आहेत. सेवाभावी कार्यात युवकांनी स्वतः ला झोकून द्यावे, यासाठी प्रा. राजाराम वट्टमवार सर यांनी दिलेल्या योगदानाचा खूप मोठा इतिहास आहे. प्रा. राजाराम वट्टमवार सर यांच्या कार्याला वंदन करण्यात यावे आणि पत्रकारांच्या हुशार मुलांना मोठी मदत व्हावी या हेतूने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
अशी होणार फेलोशिपची निवड!
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रा. राजाराम वट्टमवार फेलोशिपसाठी गरजू पत्रकारांच्या उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेतून सहा फेलोशिपची निवड करण्यात येईल. ही फेलोशिप तीन लाख रुपयांची आहे. अनेक गरजू विद्यार्थांना याचा लाभ होईल.
www.voiceofmedia.org संकेतस्थळावर या स्कॉलरशिप संदर्भातील निवड प्रक्रिया व इतर माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 98674 54144 हा संपर्क नंबरही आहे. जास्तीत जास्त युवकांनी या फेलोशिपचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आले आहे.