नागपूर – स्वामित्व योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे. महसूल भूमी अभिलेख विभाग व ग्रामविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत नागपूर विभागातील 240 गावांमध्ये नागरीकांना मिळकतीचे सनद वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती भूमी अभिलेख उपसंचालक वि.सा.शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे.
26 जानेवारी 2023 रोजी जिल्हानिहाय सनद वाटप करण्यात येणार असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 92 गावे तर चंद्रपूर- 57, वर्धा- 45, गडचिरोली- 19, भंडारा- 17 व गोंदिया- 10 अशा नागपूर विभागातील 240 गावांची निवड करण्यात आली आहे.
अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व गावांचे गावठाण्यातील सर्व मिळकत धारकांचे मिळकतीचे मोजमाप करून नकाशा तसेच मिळकत पत्रिका तयार करणे, ग्रामविकास विकास विभाग, जमाबंदी आयुक्तालय व भारतीय सर्व्हेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक ड्रोनव्दारे अचूक व जलदगतीने भूमापण मोजणी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होईल, गावातील घरे, रस्ते, शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळकतीचा नकाशा तयार होईल. कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका स्वरूपात तयार होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल.
गावठाण भूमापनाची सर्व कार्यपध्दती पारदर्शकपणे राबविली जाईल व ग्रामस्थंना त्यांचे अधिकार अभिलेख सहज सुलभपणे उपलब्ध होतील. उत्पनाचे स्त्रोत निश्चित होईल. गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद कमी करण्याबाबत गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल. ही योजना यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सिमांकन ग्रामसेवक व भुकरमापक यांच्या मार्गदर्शनानुसार करून घ्यावी असे भूमी अभिलेख विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
@ फाईल फोटो