-ॲग्रो व्हीजनमध्ये ‘विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी’ विषयावर परिषद
-बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली तर चांगला दर मिळेल
नागपूर, दि. 25: बॉटल बंद पिण्याचे पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी परिस्थिती राहिल्यास दूध उत्पादनाला बरकत कशी येईल? दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले तर आपोआप शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढेल. त्यामुळे दुधाला चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेत दुधाची मागणी वाढणे आवश्यक आहे. याकरिता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेअरीच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केली.
नागपूर शहरांमध्ये ॲग्रोव्हिजन 2021 या कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी ऍग्रो व्हिजनचे उद्घाटन केले. नागपूरमध्ये गेल्या अकरा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. आज दुसऱ्या दिवशी यामध्ये ‘विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी’ यासंदर्भात एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुनील केदार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष मिनेश शहा, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश वैद्य, ऍग्रो व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सी. डी.मायी, यांच्यासह डेअरी व्यवसायातील तज्ञ मार्गदर्शक व ऍग्रो व्हिजन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गडकरी म्हणाले, विदर्भात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी आणि राज्य शासनाच्या सहकार्याने प्रयत्न सुरु आहेत. या उपक्रमाला अधिक गती देवून प्रत्येक गावामध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून दुध संकलन सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी काळात विदर्भात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी यांनी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. गडकरी यांनी यावेळी केल्या.
श्री. केदार यांनी मार्गदर्शन करताना ऍग्रो व्हिजन सारख्या मोठ्या आयोजनात नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. पशुसंवर्धन मंत्री म्हणून दुग्धव्यवसायात वाढ करण्याबाबत राज्य स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र देशामध्ये दुधाची भुकटी तयार करणारा मोठा प्रदेश आहे. दुग्ध व्यवसाय आता हा स्थानिक व्यवसाय न राहता जागतिक व्यवसाय झाला आहे. नवनव्या तंत्रज्ञानामुळे अनेक मोठ मोठ्या उद्योग कंपन्या या व्यवसायाचे नेतृत्व करत आहे. विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेरी मार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्ही देखील सहभागी आहोत. मात्र दुग्ध व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल.
शेती उद्योगाशी संबंधित असल्यामुळे अनेक वेळा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसोबत थेट संबंध येतो. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याला अधिक भाव आणि दुधाला कमी भाव, अशी टिप्पणी ज्यावेळी शेतकऱ्यांकडून येते. त्यावेळी त्यांना या व्यवसायात आणखी गती घ्यावी, असे कसे म्हणता येईल प्रश्न पडतो. त्यामुळे दुधाला उत्तम भाव मिळाले पाहिजे. घराघरात दुग्धजन्य पदार्थाचा वापर वाढला पाहिजे. यासाठी काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. व्यवसाय म्हणून चार पैसे पदरात पडायला लागल्या नंतर त्या व्यवसायाला निश्चितच बरकत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित शास्त्रज्ञ व डेअरी उद्योगातील ज्येष्ठांना आवाहन करतांना ते म्हणाले ब्राझील मध्ये गिर गाई उत्तम प्रजातीच्या दुधाळ जनावरांमध्ये ओळखल्या जातात आपल्याकडे याबाबत दुर्लक्ष होत असून या प्रजातीला भारतात परत आणण्याचे काम केंद्र शासनाने करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आभार प्रदर्शन रमेश मानकर यांनी केले तर सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com