‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या साप्ताहिक विभागाची राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्षांची होणार नियुक्ती

 – प्रदेशाध्यक्षपदी विनोद बोरे यांची निवड,साप्ताहिकाशी संबंधित प्रश्न सोडविले जाणार, लवकरच राज्य पातळीवरचे अधिवेशनही घेतले जाणार

मुंबई :- देशपातळीवर काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंग विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी लेखक-संपादक विनोद बोरे यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, अनिल म्हस्के यांनी ही निवड केली आहे. या महिन्याअखेर विनोद बोरे हे साप्ताहिक विभागाची राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करणार आहेत.

साप्ताहिक विंगच्या निमिताने राज्यातील सर्व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधी अन् कर्मचारी एकत्रित येणार आहेत. साप्ताहिक विंगच्या माध्यमातून शासकीय जाहिरातींची रोस्टरप्रमाणे अंमलबजावणी करणे, अधिस्वीकृतीधारक साप्ताहिक संपादकांना विश्रामगृहामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणे, साप्ताहिकाच्या संपादक- पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करणे, म्हाडाच्या घरकुल योजनेच्या आरक्षणामध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना लाभ मिळणे, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीमधून साप्ताहिकाच्या संपादकांना निधी मिळावा, तसेच जिल्हा माहिती कार्यालयामधून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनांची माहिती मिळावी, आदी प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे.

येत्या 15 एप्रिलपर्यंत राज्यातल्या सगळ्या साप्ताहिकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद बोरे यांनी दिली. बोरे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून राज्यामधल्या अनेक साप्ताहिकाशी निगडित असणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने शासन उदासीनता दाखवत आहे. साप्ताहिक विभागाशी संबंधित असणारे अनेक प्रलंबित प्रश्न याकडे कोणीही पाहण्यासाठी उत्सुक नाही. हे सगळे प्रश्न या अधिवेशनाच्या निमित्ताने मार्गी लावण्याचे काम आम्ही करणार आहोत. यासाठी साप्ताहिक विभागाशी संबंधित असणारे सगळे पदाधिकारी एकत्रित काम करतील, ते एकत्रित येतील आणि आपल्या प्रश्नावर लढा देतील.

साप्ताहिक विभागाशी संबंधित असणाऱ्या संपादक, पत्रकार यांनी बोरे यांच्याशी या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा, असे आवहान ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे. या महिन्याअखेरीस राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com