ओमिक्रॉन विषाणूसंदर्भात मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करा – डॉ. नितीन राऊत

 

-कोविड प्रोटोकॉल पाळूनच कार्यक्रमांना परवानगी

-लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा

-विदेशातून येणाऱ्या प्रत्येकांची तपासणी

-लहान मुलांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स

नागपूर, दि. 20 : ओमिक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ओमिक्रॉन विषाणूपासून संभाव्य धोक्याच्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय टास्क फोर्सचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या डॉ. श्रीमती तायडे, आरोग्य उपसंचालक संजय जैस्वाल, टास्क फोर्सचे डॉ. ‍मिलिंद भुरसुंडी, डॉ. सरनाईक, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण इंग्लंडमध्ये वाढत आहेत. तसेच देशात व राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्याच्या सूचना देताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूर शहरात संभाव्य रुग्णांची नोंद झाली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विदेशातून शहरात सुमारे 750 प्रवासी दाखल झाले असून या सर्वांचा शोध घेवून महानगरपालिकेतर्फे कोविड तपासणी सक्तीची करावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचा टास्कफोर्सतर्फे यावेळी माहिती देण्यात आली. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. शहरात पहिला डोज शंभर टक्के पूर्ण झाला असून ग्रामीण भागात 90 टक्के झाले आहे. त्यासोबतच शहरी व ग्रामीण भागात दुसरा डोज पूर्ण करण्याला प्राधान्य देवून येत्या दहा दिवसांत लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी डॉ. राऊत यांनी दिले. लसीकरणासाठी ग्रामीण भागातील संरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पोस्ट कोविड रुग्णांची तपासणी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याचे आवश्यकता व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, अशा रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करुन त्यांना आहार व आरोग्याविषयी माहिती देण्यात यावी. कोविडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अवलंबून असलेल्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. जिल्ह्यात आर्थिक मदतीसाठी आठ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये साडे सहा हजार अर्ज शहर तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रभागनिहाय तसेच तहसील कार्यालयस्तरावर विशेष कर्मचाऱ्यांच्या सेवा घेण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
ओमिक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला टास्कफोर्स त्वरित गठित करावा व या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन व उपचार पद्धतीबाबत माहिती देण्यात यावी. बालकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक औषध पुरवठा तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉलचे पालन आवश्यक
ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण ख्रिसमस तसेच 31 डिसेंबर नववर्षाचे स्वागत यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन होणार नाही. तसेच कोविड प्रोटोकॉलचे सक्तीने पालन होईल. यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच पोलीस विभागातर्फे संबंधित प्रतिनिधींना निमंत्रित करुन गर्दी टाळण्यासोबतच प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य करताना कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
प्रारंभी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे -वर्मा यांनी कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी ऑक्सिजनची उपलब्धता, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची सद्य:स्थिती, व्हेंटिलेटर तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत सुरु असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भुरसुंडी, डॉ. सरनाईक यांनी ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संदभातील सद्य:स्थितीबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. वैशाली शेलगावकर यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली शेलगावकर यांचा इंडियन क्रिटीकल केअर सोसायटी, नवी दिल्ली या संस्थेतर्फे अहमदाबाद येथे कोविड योध्दा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. कोविड काळात मेयो हॉस्पीटलमध्ये कोविड रुग्णांचे व्यवस्थापन, ऑक्सिजन सुविधा व उपचार यासंदर्भात केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर डॉ. शेलगावकर यांचा गौरव करण्यात आला.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. वैशाली शेलगावकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. भारतीय बधीरीकरण संस्थेतर्फे त्यांचा नुकताच कोविड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे गठीत करण्यात आलेल्या कोविड ग्रिव्हेन्सेस कमेटीवरही त्यांची नेमणूक करण्यात आली.

-दिनेश दमाहे

9370868686

dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

तेजस संस्थेचे चंद्रशेखर अरगुलेवार यांना राष्ट्रीय उमेद रत्नाने सन्मानित

Mon Dec 20 , 2021
 कामठी :- तेजस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा प्रत्येक राज्यात गौरव केला जात आहे, अरगुलेवार हे केंद्रीय दलात सेवा बजावत असतानाही त्यांना प्रत्येक तुकडीमध्ये सन्मानित करण्यात यावे. बळ.देशप्रेमाचा, देशसेवेच्या भावनेचा सन्मान करून, सेवेचा राजीनामा देऊन तीच तळमळ त्यांनी दाखवली, चंद्रशेखर अरगुलेवार हे गेली तीन वर्षे अविरतपणे तरुणांना जागृत करण्याचे काम करत आहेत.त्यांनाही मिळाले आहे. प्रशिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com