-सीमेवरच्या सैन्याला मदत करण्यासाठी आता क्यूआरकोड
-या वर्षी उद्दिष्ठाच्या दुप्पट निधी गोळा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नागपूर : अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देशांच्या सीमांवर दक्ष असणाऱ्या सैनिकांच्याप्रती दायित्व म्हणून समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, कामगार, उद्योगपती वा उद्योजक, ध्वजनिधी संकलनामध्ये प्रत्येकाने औपचारिकता किंवा उद्दिष्टपूर्ती म्हणून नव्हे तर दायित्व म्हणून भरभरून मदत करावी, असे भावनिक आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी आज येथे केले.
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून साजरा होतो. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. सोबतच महाराष्ट्र शासनाने 1999 पासून महाराष्ट्रातील सैन्यदलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील जवानांना वार्षिक आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला निर्धारित लक्ष दिले जाते. यावर्षी जिल्ह्याला दोन कोटी रुपयांचे लक्ष्य दिले गेले आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्यात दरवर्षी सात तारखेला हा कार्यक्रम घेतला जातो. आजच्या कार्यक्रमात पाकिस्तान विरुद्ध सीमेवर लढताना जखमी झालेल्या हवालदार विजय मनोहर तल्हारे यांना वीस लाख रुपये अनुदान धनादेशाद्वारे देण्यात आले.
या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी विमला आर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, मनपा सहायक आयुक्त महेश धामेच्या, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, नागपूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर (निवृत्त ), शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके आदी समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी नोकरीच्या अगदी सुरुवातीपासून ध्वजनिधी संकलनाचे कार्य प्रत्येक अधिकाऱ्याने केले आहे. भारतासाठी कठीण परिस्थितीत आमच्यावतीने, आमच्यासाठी, विपरीत परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सैन्य दलासाठी हे कार्य करण्याचे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या अंगी बांधावे, असे आवाहन केले.
ही कर्तव्यपूर्ती नाही तर सामाजिक दायित्व आहे. यावेळी पूर्व विदर्भातून सर्वाधिक उद्दिष्टपूर्ती होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी सर्व जिल्ह्याला केले आहे.
जिल्हाधिकारी विमला आर यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुखांनी मोठ्या प्रमाणात ध्वजनिधी संकलन होईल याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले. यावेळी देशाच्या सैन्यासाठी किती मदत करावी असा आकडा कोणी ठरवू नये आणि त्याहीपेक्षा ठरलेला आकडा पूर्ण होऊ नये यासारखे दुःख नसते. मात्र आता या जिल्ह्यांमधून उद्दिष्टपूर्ती झाले नाही असे होणार नाही. विभागातले सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व अन्य विभागाचे सर्व प्रमुख यासाठी प्रयत्न करतील याची खात्री असून जे उद्दिष्ट ठरले आहे त्याच्या दुप्पट निधी निश्चित गोळा होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित सर्व समिती सदस्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर (निवृत्त) यांनी केले तर आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सत्येन्द्र कुमार चवरे यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात जिल्हाभरातील सैनिकांच्या कुटुंबीय, दरवर्षी या कार्यक्रमात सामाजिक दायित्व ठेवून स्वतः उपस्थित राहून धनादेश देणारे दानशूर नागरिक सैनिकांच्या कुटुंबियातील गुणवंत व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन करणाऱ्या नागपूर महानगरपालिका सहआयुक्त महेश धामेचा, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक वर्ग-1 श्री संजय तरासे, उपविभागीय अधिकारी सावनेर अतुल म्हेत्रे, सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे, मोहाड नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पल्लवी राऊत, राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनवणे, विदर्भ पाटबंधारे विकास कार्यकारी अभियंता संजय उराडे, औष्णिक विद्युत केंद्र मुख्य अभियंता राजू घुगे, प्रथमेश देशपांडे, प्रतिभा पेंढारकर, मृदुला चांदे तामसकर आदींना उत्कृष्ट ध्वजनिधी संकलनासाठी सन्मानित करण्यात आले.
सैनिकांच्या कुटुंबातील इशिका राजेश वरवाडे, राजेश सुरेश महाले, साक्षी ईश्वर लोडे, जानवी यादव जुनघरे, गौरव ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्तेसाठी रोख पुरस्कार देण्यात आले.
सहस्त्रभोजणे कुटुंबाकडून याही वर्ष 1 लक्ष अर्पण
माहिती विभागाचे सेवानिवृत्त मुख्य संचालक श्रि.ग.सहस्त्रभोजणे गेल्या नऊ वर्षापासून आपल्या निवृत्ती वेतनातून दरवर्षी एक लक्ष रुपये ध्वजनिधी संकलनासाठी देतात. यावर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांच्या पत्नी वसुधा सहस्त्रभोजने यांनी एक लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हा सैनिक कार्यालयाला दिला.
फुल विक्रीते देतात दर महिन्याला पाचशे रू.
आजच्या कार्यक्रमांमध्ये ध्वजनिधीला दर महिन्याला 500 रूपये देणारे फुल विक्रेते मनीष आणि आशिष गडीकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या अल्प मिळकतीतून नियमित पाचशे रुपये महिन्याला देऊन ते आपले सामाजिक दायित्व पूर्ण करतात.
जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनलाइन पेमेंट
ध्वज निधी संकलनासाठी ऑनलाइन व्यवस्था करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने यामध्ये पुढाकार घेत या वर्षी क्यूआरकोड निर्माण केला. यावर पोचपावती देखील तात्काळ मिळते. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी क्यूआरकोडचा वापर करीत ध्वजनिधी खात्यात रक्कम जमा केली.