नागपूर : जिल्ह्यात 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वादरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा प्रारंभ विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे, उपायुक्त सुरेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. सामाजिक न्याय भवन येथून प्रारंभ होऊन संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी संविधान चौकात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुस्तकाच्या स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक आयुक्त डॉ. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.रॅलीमध्ये समाजिक न्याय विभागांतर्गत मूकबधीर व दिव्यांग शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी जयश्री धारवाल, चिवंडे यांचे सहकार्य लाभले.