मुंबई :- “स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.
स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा.स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडीश आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडन देशसुध्दा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.