नागपूर :- जिल्हा परिषदेच्या गावा-गावांमध्ये शाळा आहेत. दूरवर शाळा असल्याने सर्व शाळांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून या शाळांवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये डिजिटल यंत्रणा लावली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या खेडोपाडी शाळा आहेत. मात्र, सर्वच शाळांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होत नाही. परिणामी अनेक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा लावली जाणार आहे.
प्रायोगिक तत्वावर 9 शाळांमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. त्यानंतर हळूहळू सर्व शाळांमध्ये ही यंत्रणा बसवली जाईल. या माध्यमातून विद्यार्थी शाळेत येतात की नाही, शिक्षक वेळेत पोहचतात की नाही, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कसा मिळतो, शिक्षक कशा प्रकारे शिकवितात, यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे यांनी दिली.