नागपूर :- मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट,सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. याकरीता प्रशिक्षणास इच्छूक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले. प्रशिक्षणासाठी एकूण 1556 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. 1127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यातील 92 विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सस्केस पुणे या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट, सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. याअंतर्गत एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आवश्यक व अकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले. मोफत प्रशिक्षणात निवडण्यात आलेल्या विषयाचे वर्ग, विषयवार चर्चा, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रियंका ठाकरे, परमेश्वर दास, वैभव कापसे, भुपेंद्र ढाले, महेश भांडे, भावीका शिंदे, अश्विनी वडे, उमेश पालवे, रिना चव्हाण, खुशवंत नांथे, विशाल आदमने, अपेक्षा गावंडे, विष्णू गोरे, मनिषा तोरकडे, विकास पिसे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या युजीसी नेट, सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.