नागपूर :- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून बाजार समितीकडून अद्ययावत अग्निशमन योजनेसाठी सात कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी पणन विभागाच्यावतीने उत्तर देताना आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत आज सदस्य कृष्णा खोपडे यांनी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत लक्ष वेधले होते. त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. त्यांनी सांगितले की, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मिरची बाजार लिलाव गृह २ मध्ये आग लागली होती. यात शेतमाल अंदाजे १८०० बोरे (४० किलो प्रती बोरा) मिरचीचे नुकसान झालेले आहे. त्याची अंदाजित किंमत ९० लाख रुपये आहे. या आगीवर बाजार समितीने अग्निशमन दलाद्वारे व समितीमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याद्वारे नियंत्रण आणले.
बाजार समितीमधील अग्नी सुरक्षा यंत्रणेअंतर्गत धान्य बाजारात सहा किलोचे ४८ फायर सिलेंडर आहेत. सहा फायर हायड्रन्ट बसविले आहेत. अग्निशामकच्या गाडीमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था असून पाणी फवारणीसाठी पाईप आहेत. त्यानंतर बाजार समितीकडून अद्ययावत अग्निशमन योजनेसाठी प्रस्ताव प्राप्त झाला आहे, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले