यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा व अनाथ प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली जाणार आहे.
एक टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागामार्फत संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडील यांचा मृत्यूचा दाखला, अर्जदाराचा जन्म दाखला, सरपंच, पोलीस पाटील, सरपंच यांचा बालकाचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखला, ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र इत्यादीची आवश्यकता आहे.
तसेच शासनाच्या इतर योजनांसाठी राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, राज्य वय व अधिवास दाखला आदी कागदपत्रे या अनाथ पंधरवाड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही होणार आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी कळविले आहे.
File photo