नागपूर : शेतमाल विक्री हा शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पानातील महत्वाचा दुवा असून शेतकरी आपल्या मालाची स्वत: विक्री करू लागला तरच त्याची परिस्थीती सुधारेल व त्यासोबतच देशाची देखील भरभराट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबतच मार्केटींग शिकून आपल्या शेती उत्पन्नाची विक्री करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत ओमप्रकाश जेजोदीया यांनी व्यक्त केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यामार्फत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या पद्व्युत्तर वसतिगृह परिसरात दिनांक 4 जानेवारी पासून आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप आज करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी क्रांती केंद्राचे संचालक ओम जाजोदीया बोलत होते. याप्रसंगी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्रज्ञ सुनिता चव्हाण, कृषी विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. विनोद राऊत, प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी कृषी महोत्सवात आपला शेतीमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. झरप ता. कामठी येथील नैसर्गिक सेंद्रीय शेतकरी गटाचे विनोद रयसे, सालई गोधणी ता. नागपूर येथील तुळजाभवानी शेतकरी महिला बचत गटाच्या शिल्पा कोहळकर यांनी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
दिनांक 4 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित कृषी महोत्सवात एकूण 55 लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली असून कोणीही मध्यस्थ नसल्याने हा सर्व पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा कृषी महोत्सवात सहभागी शेतकरी, शेतकरी गट, विशेष कार्य करणारे प्रत्येक तालुक्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार सचिन ताकसांडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, कृषी महोत्सवात सहभागी शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र व संबंधित विविध कृषी महामंडळे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते