दिवाळीच्या दिवशीही शहर स्वच्छतेसाठी मनपाचे 5,150 स्वच्छता कर्मचारी कार्यतत्पर

नागपूर :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने सगळीकडच्या बाजारपेठा व दुकाने गजबजून गेलेली दिसतात. यामुळे नेहमी पेक्षा कच-याच्या प्रमाणातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे ‍दिसून येते. या अनुषंगाने नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाचे स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी आणि अधिकारी आपल्या सेवेस तत्पर आहेत. दिवाळीनिमित्त मार्गांवर होणाऱ्या अस्वच्छतेचा नायनाट करण्याकरिता मनपाचे 5,150 कर्मचारी कार्यतत्पर होते.

दिवाळीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची आणि स्मार्ट स्वच्छता चमुची तैनाती करण्यात आली होती. या सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित स्वच्छतेचे कार्य करीत शहराला स्वच्छ साकारण्यात हातभार लावला आणि स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी केली.

शहरातील प्रदूषणाच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूरकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी तसेच कमीत कमी फटाके फोडावेत असे आवाहन केले होते. याशिवाय अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान 2.0’ अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ या अभियानामध्ये स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले.

दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात नेहमीपेक्षा अधिक भर पडल्याचे निदर्शनास येते. यादृष्टीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील विविध मार्गांवर फटाक्यांचा कचरा जमा होऊ नये याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशनुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आणि चमू यांनी मनपाचे सर्वच स्वच्छता कर्मचारी आणि स्मार्ट स्वच्छता चमू तैनात केले होते.

यात मनपाच्या लक्ष्मी नगर झोन मध्ये 360 कर्मचारी, धरमपेठ झोन मध्ये 479 कर्मचारी,हनुमान नगर झोन मध्ये 375 कर्मचारी, धंतोली झोनमध्ये 377 कर्मचारी, नेहरूनगर झोन मध्ये 358 कर्मचारी, गांधीबाग झोन मध्ये 565 कर्मचारी, सतरंजीपुरा झोन मध्ये 643 कर्मचारी, लकडगंज झोनमध्ये 427 कर्मचारी, आसीनगर झोन मध्ये 548 कर्मचारी आणि मंगळवारी झोन मध्ये 530 कर्मचारी तैनात होते. याशिवाय इतर कर्मचारी व शहर स्वच्छतेसाठी विशेषाने तैनात स्मार्ट स्वच्छता चमूचे कर्मचारी देखील झोननिहाय तैनात करण्यात आले होते.

या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमित कार्य करीत विविध मार्गांची स्वच्छता केली. तसेच मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता चमू’ने स्वच्छता कार्य पार पाडले. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूलांवर मनपाद्वारे अत्याधुनिक स्वच्छता मशीनद्वारे मार्ग स्वच्छतेचे कार्य करण्यात आले. या मशीनद्वारे सूक्ष्म अशा कचऱ्याची देखील विल्हेवाट लावण्यात मदत झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'युवा चेतना मंच 'तर्फे रनाळा येथे शिवकालीन किल्ला तयार करून दिला संदेश

Tue Nov 14 , 2023
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास इतरांना कळावा या उद्देशाने दरवर्षी युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथे शिवकालीन किल्ला तयार करण्यात येतो. युवा चेतना मंच चे प्रा पराग सपाटे हे त्यांच्या घरी आदर्श नगर येथे शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती तयार करीत असतात. प्रा पराग सपाटे मागील दहा बारा वर्षा पासून खंड न पडू देता आपल्या घरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com