नागपूर :- घरात झोपून असलेल्या वीस वर्षीय सुशिक्षित आदिवासी तरुणी मयुरी विजय धुर्वे हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या परिवाराला शासनाने व वन विभागाने नुकसान भरपाई पोटी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा धिकारी व वन विभागाकडे केली आहे.
27 जुलै रोजी हिंगणा तालुक्याच्या नेरी मानकर गावातील कृषीचे शिक्षण घेणारी मयुरी ही महाविद्यालयीन मुलगी जी आई-वडिलांना एकटीच होती ती रात्री आईसोबत घरात झोपून असताना तिला विषारी सापाने चावा घेतला. तिच्यावर वानाडोंगरीच्या शालीनीताई मेघे रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. बसपा नेत्यांनी मयुरीच्या निवासस्थानी भेट देऊन त्या कुटुंबांचे सांत्वन केलेले आहे.
साप हा वन्य प्राणी आहे. त्याला मारणे हा गुन्हा आहे. वन्य प्राण्यांमुळे जीव व वित्तहानी झाल्यास वनविभाग नुकसान भरपाई देत असते. साप हा पाळीव प्राणी नसून वन्य प्राणी आहे. तो जर आमच्या घरात येऊन आम्हाला नुकसान पोहोचवत असेल ज्यामुळे आमचा जीव जात असेल तर त्याला वन विभाग जबाबदार आहे असे बसपा नेत्यांचे मत आहे.
नुकतेच 23 जुलैला भिवापूर तालुक्यातील भगवानपुरात तीन वर्षीय संदेश दोडके हा बालक आईच्या कुशीत झोपला असताना विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. संदेशच्या वडीलाचे कोविड काळात निधन झाले त्यामुळे त्याच्या आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
साप चावून मृत पावलेल्यांची संख्या ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर याला बळी पडत असतात. परंतु साप चावून मृत पावलेल्यांच्या परिवाराला आत्तापर्यंत काहीही आर्थिक मदत मिळालेली नाही. कारण साप हा तांत्रिकदृष्ट्या त्या वन्य प्राण्यांच्या यादीत नसल्याचे सांगितले जाते. जर साप त्या यादीत नसेल तर सापाला त्या यादीत टाकावे व तोपर्यंत साप चावून मृत पावलेल्या मृतांच्या परिवाराला विशेष बाब अंतर्गत आर्थिक मदत करावी अशी मागणी बसपा चे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
बसपाच्या शिष्टमंडळाने नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांची नुकतीच भेट घेतली असता त्यांनी ते निवेदन वन विभागाच्या स्वाधीन करण्यास सांगितले. त्यानुसार नागपुरातील उपवन संरक्षण विभागातील कार्यालय अधीक्षक बी एल इनवाते ह्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सोपविण्यात आले. शिष्टमंडळात बहुजन समाज पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, नेरी मानकर चे सरपंच कमलाकर हांडे व मृतक मयुरी चे वडील विजय धुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.