– कृपाल तुमाने यांच्या प्रश्नावर स्मृती इरानी यांचे उत्तर
नागपूर :- कोविड काळात जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारकडून ५० लाख रुपयांचे वीम कव्हर देण्यात आले आहे. रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इरानी यांनी ही माहिती दिली.
कोविड -१९ च्या संकट काळात थेट सेवा देणारे सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ता, खासगी आरोग्य कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून काम करीत होते. अशा देशभरातील २२ लाख १२ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यामतून ५० लाख रुपयांचा खासगी अपघात कव्हर प्रदान करण्यात आला आहे. जुलै २०२३ पर्यंत या योजनेअंतर्गत ३८ दावे पूर्ण केले असून १९ कोटी रुपयांची राशी वाटप करण्यात आली आहे. सोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांणा प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन (PM-SYM) योजनेअंतर्गत पेंशन स्किम लागू केली असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ६० वर्षानंतर दर महिन्याला ३ हजार रुपये पेंशन मिळणार आहे. या योजनेत सरकार समान रुपात वाटा देणार आहे. ही स्किम राज्यांनी लागू करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरात १२ लाख ९३ हजार ४४८अंगणावडी कार्यकर्ता, ११ लाख ६४ हजार १७८ अंगणवाडी सहायिका काम करीत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली असल्याची माहिती दिली.
२ लाख अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण
सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत २०२५-२६ सालापर्यंत दरवर्षी देशभरातील ४० हजार अंगणवाडी केंद्र प्रमाणे २ लाख अंगणवाडी केंद्रांना सक्षम अंगणवाडी करण्यात येणार आहे. २०२२-२३ या वर्षांत ४१ हजार १९२ अंगणवाडी केंद्रातून एलईडी व स्मार्ट शिक्षण केंद्र म्हणून स्थापित करण्यात आल्या आहेत. यासोबतच पेयजल सुविधा व शौचालय निर्मितीसाठी १२ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.
१३.९ लाख केंद्राचे डिजिटलायजेशन
अंगणवाडी केंद्रावर वितरण प्रणाली मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठी आयटी प्रणालीचा वापर करण्यात येत असून १ मार्च २०२१ पासून पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. देशभरातील १३.९ लाख केंद्रांनी सहभागी झाले आहे. हे अॅप्लिकेशन देशभरातील २४ भाषात उपलब्ध आहे. यामुळे अंगणवाड्यांचे डिजिटलीकरण झाल्याने त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पदोन्नती व कर्मचारी भरतीसाठी देखील योजना आखण्यात आली आहे.