यवतमाळ :- जिल्ह्यातील पुसद पथकातील होमगार्ड जवान शेख गफार शेख मनसब यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियास विमा रक्कम म्हणून 50 लाख रुपयांचा धनादेश जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्याहस्ते देण्यात आला.
होमगार्डना कायदा व सुव्यवस्था दरम्यान पोलिसांसोबत कर्तव्यावर तैनात करण्यात येते. त्यावेळी अघटीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांप्रमाणे होमगार्डला सुद्धा विम्याची सुरक्षा आवश्यक आहे. त्यासाठी होमगार्ड महासमादेशक रितेशकुमार यांनी पुढाकार घेवून राज्यातील 50 हजार होमगार्डना एचडीएफसी बँकेचा विमा उपलब्ध करून दिला आहे. होमगार्ड जवान शेख गफार शेख मनसब यांचे निधन झाल्यानंतर त्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातर्फे एचडीएफसी बँकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या वारसदार पत्नीला 50 लाखाचा धनादेश व दोन मुलांसाठी प्रत्येकी पाच लाख रूपयांची तरतूद करण्यात आली.
राज्यात होमगार्ड संघटनेची स्थापना डिसेंबर 1946 रोजी झाली. सदर संघटनेत स्वतः व्यवसाय व नोकरी सांभाळून स्वयंस्फूर्तीने देशसेवा करण्याच्या उद्देशाने नागरीकांची मानसेवी स्वरूपात होमगार्ड स्वयंसेवक म्हणून भरती करून घेण्यात येते. कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीमध्ये पोलिसांना सहाय्य करणे, संपकाळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास सहाय्य करणे ही होमगार्ड स्वयंसेवकाची प्रमुख कर्तव्य आहेत. हे स्वयंसेवक मानसेवी असल्याने त्यांना कर्तव्यापोटी मानधन दिले जाते.
धनादेश वितरण प्रसंगी जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह शेख गफार शेख मनसब यांच्या पत्नी तसेच त्यांची मुले व जिल्हा समादेशक कार्यालयाचे प्रशासनिक अधिकारी मनोज गजभिये, केंद्र नायक राजेंद्र बनसोड, अजय तेलंग उपस्थित होते.