नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात एकूण 6 तक्रारींपैकी 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर 1 तक्रार नव्याने दाखल झाली. या तक्रारींसदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्याच्या सूचना देत वेळेत प्रकरण निकाली काढण्याचा विश्वास श्रीमती बिदरी यांनी दिला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विभागीय लोकशाही दिनात नागपूर महानगरपालिकेच्या गांधी झोन व जिल्हाधिकारी कार्यालयांतर्ग येणाऱ्या नझूल जमीनीवरील अतिक्रमणाच्या 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथील भूमी अभिलेख विभागासंदर्भातील अतिक्रमणाच्या प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांनी भूमि अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून यासंदर्भातील सुस्पष्ट अहवाल मागविला आहे.
वर्धा जिल्ह्यातीलच आर्वी येथील एका प्रकरणात सरकारी जमीनीवरील अतिक्रमण हटविण्याचे प्रकरण तसेच आर्वी तालुक्यातील नांदपूर येथील तक्रारदाराने बेकायदेशिररित्या सांडपाणी वाहून नेणारी नाली अडविल्याबाबत पोलीसात दाखल तक्रारी विषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. भंडारा येथून अतिक्रमणाबाबत दाखल नवीन तक्रारी विषयी जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तूस्थिती दर्शक अहवाल मागविण्यात आला आहे.
यावेळी विभागीय आयुक्तालयाचे सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी व आयुक्तालयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस, महिला व बालकल्याण, भूमि अभिलेख आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.