चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पूर्णतः नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे.योजनेचे बरेच काम पूर्ण झाले असुन त्यामुळे शहरातील बराच भाग हा टँकरमुक्त झाला आहे.
उन्हाळ्यात शहरातील राष्ट्रवादी नगर,आंबेडकर नगर, तुकूम, आंबेडकर भवन परिसर,हवेली गार्डन इत्यादी भागात पाणी टंचाई जाणवायची त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करणे भाग होते.मागील वर्षी यांत्रीकी विभागामार्फत शहरात १२ टँकरने पाणी पुरवठा केला गेला होता.यंदा अमृत योजनेचे बऱ्याच भागातील काम पूर्ण झाल्याने आता या टँकरची संख्या ४ वर आली आहे.म्हणजेच ८ टँकर पाणी पुरवठ्याची मागणी कमी झाली आहे, कारण त्या जागी आज अमृत योजना पोहोचली आहे.
उर्वरीत भागातही योजनेचे काम सुरु आहे. अनेक जागी मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले असुन काही जागी शिल्लक आहे तसेच काही किरकोळ गळती दुरुस्ती करण्याचेही काम सुरु आहे. या त्रुट्या दुरुस्त करून इतर भागातही लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ होत असते. सातत्याने वाढणारे उष्णतामानाने पिण्याच्या पाण्यासह उकाडा घालविण्यास कुलर सारख्या गोष्टींचा दैनंदिन वापर केला जातो. अशा परिस्थितीत शहरवासीयांकडून पाण्याच्या वापरात लक्षणीय वाढ होते. वाढीव मागणीचा विचार करता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वाढीव स्वरूपात पाणीपुरवठा केला जातो.