नागपूर :- शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते. मात्र, शाळेकडून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते. यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे. याचा आज प्रत्यय आला आणि आज पार पडलेल्या सभेत २ अनुकंपा, १ निवड श्रेणी, १ मुख्याध्यापक, १ ग्रंथपाल नियुक्तीस “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले. यासह अन्य प्रकरणे बैठकीत निकाली काढण्यात आल्याने शिक्षकांकडून आमदार सुधाकर अडबाले यांचे कौतुक करण्यात येत आहे.
‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी नागपूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.), पे युनिट अधीक्षक (माध्य.), लेखाधिकारी यांच्यासोबत समस्या निवारण सभा प्रोव्हिडन्स प्रायमरी स्कूल नागपूर येथे घेतली. ही सभा सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत सहा तास चालली.
सभेत मोहन करडभाजने यास सुहास विद्यालय वाई येथे प्रयोगशाळा परिचर सेवक, कृणाल बोपचे यांना न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्यू. कॉलेज महाल नागपूर येथे प्रयोगशाळा सहायक सेवक पदास तसेच शैलेश येडके (सहा. शिक्षक, समर्थ हायस्कूल, रामटेक) यांना निवड श्रेणी, सरस्वती विद्यालय येथील चाफले यांना मुख्याध्यापक, झाडे यांना ग्रंथपाल पदास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील संच मान्यता दुरुस्तीबाबत झालेल्या कॅम्पची सविस्तर माहिती घेण्यात आली. यात ४९ प्रकरणापैकी फक्त १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात परत एक दिवस कॅम्प घेण्याबाबत वरिष्ठांना पत्र पाठवावे, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या प्रलंबित मान्यता प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदानाची रक्कम अदा करणे, गटविमा रक्कम अदा करणे, वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते, वैद्यकीय देयके, जीपीएफ / एनपीएस पावत्या, पेन्शन प्रकरणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १४ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना पेंशन मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ उन्नयन करणे, अनुकंपा प्रकरणे व इतर १०० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या सभेच्या विषयपत्रातील बहुतांश प्रकरणे सभेच्या आधीच निकाली काढण्यात आली. उर्वरित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या.यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) रोहिणी कुंभार, उपशिक्षणाधिकारी बनसोड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, कार्यवाह अविनाश बडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, विज्युक्ताचे डॉ. अशोक गव्हाणकर, विमाशी संघाचे विजय गोमकर, विष्णू राणे, मंगेश घवघवे, प्रमोद अंधारे, दिलीप बोके, यशवंत कातरे, अरुण कराळे, धनराज राऊत, राजेश धुंदाड, लक्ष्मीकांत व्होरा, निलेश खोरगडे, शैलेश येडके, सूर्यकांत वानखेडे, चाफले, सचिन इंगोले, आशुतोष चौधरी, विजय चौधरी, प्यारेलाल लोणारे, चंद्रपूर महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, नितीन देवतळे व विमाशी संघाचे सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.