शहीद ओंबळेंचे देशावर उपकार🙏
26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री सुरू झालेला मुंबई हल्ल्याचा थरार चौथ्या दिवशी, 29 नोव्हेंबरच्या सकाळी थंडावला, तो शेवटचा अतिरेकी मारला गेल्यावर. मी, श्रीनिवास वैद्य आणि अविनाश पांडे असे तिघेही या समाप्तीचे साक्षीदार होतो. रोजच्याप्रमाणे सकाळीच आम्ही मॅजेस्टिक आमदार निवासातून बाहेर पडलो आणि गेट वे आँफ इंडियाच्या पटांगणात उभे राहून ताजकडे डोळे रोखून उभे राहिलो. थोड्याच वेळात (साडेसातच्या सुमाराला) दुसऱ्या माळ्यावरील एका खोलीच्या खिडकीतून, संपूर्ण काळे कपडे घातलेला, हाती बंदूक असलेला एक इसम खाली जमिनीवर पडला. क्षणभर आम्हाला वाटले, आपला कमांडोच मारला गेला. परंतु, चॅनेल्स वर सुरू असलेल्या थेट प्रक्षेपणातून (हे चॅनेल्सवाले आमच्या बाजूलाच उभे होते🤔) कळले की, तो खात्मा झालेला अतिरेकी होता. याक्षणी दहशतवाद्यांशी सुरू असलेला 60-62 तासांचा संघर्ष संपला आणि संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
या दीर्घ लढ्याचे खरे नायक ठरले असिस्टंट सब इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे. या बहाद्दराने स्वत:चे प्राण देऊन कसाबला जिवंत पकडण्याचा मार्ग मोकळा केला आणि पाकिस्तानविरुद्धचा एकमेव पुरावा देशाच्या हवाली केला. कसाबच्या गोळ्यांपासून आपले सहकारी वाचावे यासाठी ओंबळेंनी त्याला मिठी मारून त्याच्या बंदुकीतील सर्वं गोळ्या स्वत: झेलत कसाबला नि:शस्त्र केले. त्यामुळेच कसाब जिवंत सापडला आणि पाकिस्तानचा कट सप्रमाण सिद्ध होऊ शकला. (त्याचे उर्वरित 9 साथीदार मारले गेले आहेत.) ओंबळेंचे हे ऋण देशाने कधीही विसरू नये, एवढे त्यांचे बलिदान उच्च कोटीचे आहे.
परंतु त्याचवेळी, तीन उच्च पोलिस अधिकाऱ्यांनी घाईत घोडचूक करून स्वत:चे प्राण गमावले, असेच खेदाने म्हणावे लागेल. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर या तिघांना एकावेळी मारण्याची संधी कसाब-इस्माईलने कामा हॉस्पिटल जवळ अचूक घेतली. हे तिघे एकाच वाहनात नसते तर त्यांच्यापैकी दोघे नक्कीच वाचू शकले असते आणि कदाचित अतिरेक्यांना या भागातच अडवूही शकले असते. तिघेही सीएसटीवरून एकाच वाहनातून कसे काय निघाले, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आज 15 वर्षानंतरही मिळालेले नाही. चुकीचा, घिसाडघाईचा निर्णय किती महागात पडतो, त्याचेच हे दुर्दैवी उदाहरण होय.
या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याने देशाला काही धडे दिले. पहिला- भारतात राहून देशाशी गद्दारी करणारे बेईमान आपल्याकडे जागोजागी बसले आहेत. अशा देशद्रोह्यांना हुडकून ठेचले पाहिजे. दुसरा- त्यासाठी आपली गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा वेळोवेळी अत्याधुनिक आणि मजबूत करणे आवश्यक आहे. मुंबईत पूर्वी झालेले आरडीएक्सचे स्फोट आणि हा हल्ला यातून एवढे तरी शिकायलाच हवे. तिसरा- अशा घटनांचे वृत्तांकन प्रसारमाध्यमांनी, त्यातही दृश्यमाध्यमांनी जबाबदारीने केले पाहिजे, यासाठी काही बंधने आवश्यक आहेत. चौथा- थेट प्रक्षेपण हे अत्यंत परिणामकारक असते. त्यातील बेजबाबदारपणा खपवून घेणे देशाला महागात पडते. यासंदर्भात कठोर कायदे करणे आवश्यक आहे. मुंबई हल्ल्यातील अनेक घटनांचे टीव्हींवरील थेट प्रक्षेपण अतिरेक्यांच्या फायद्याचे ठरले. हे प्रक्षेपण पाहून पाकिस्तानातील सूत्रधार हल्लेखोरांना सूचना देत होते, योजना बदलवत होते, असे लक्षात आले आहे. या हल्ल्याच्या 7 वर्षे आधी, 2001 मध्ये अमेरिकेत ट्विन टॉवर्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे एकही भीषण दृश्य तेथील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध वा प्रसारित केले नाही. ही संवेदनशीलता भारतीय पत्रकारितेला शिकविण्याची गरज आहे. तसेच, समाजमाध्यमांच्या तर मुसक्याच बांधण्याची वेळ आलेली आहे. अत्याधुनिक दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आपणही तेवढेच सज्ज असले पाहिजे, हाच मुंबई हल्ल्याचा बोध होय.
(पूर्ण, पुन्हा कधीतरी)
– विनोद देशमुख