नागपूर :- देशासह जगभरातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीला मंजुरी मिळाली आहे. या महत्वाच्या कार्याला गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे पाउल उचलले असून त्यांचे मनापासून अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर नागपुरात साकारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटरच्या कामासाठी आवश्यक १४.९४ कोटी रुपये निधीला मंजुरी प्रदान केली. या निर्णयानंतर ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सामाजिक जाणीवा असलेला नेता म्हणून गौरव करीत त्यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासकामांसाठी तब्बल १५०० कोटींचा भरघोष निधी नुकताच जाहिर केला आहे. लाखो, कोट्यवधी लोकांचे प्रेरणास्थान असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या महत्वाच्या पुढाकारामुळे आता दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा प्रदान होणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची क्षमता वाढविण्याचा निर्णय हा असंख्य विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. देशासह जगभरातील विद्यार्थी आणि संशोधकांना अध्ययन आणि संशोधनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर ही मौलीक उपलब्धी ठरणार आहे. मात्र मागील काही वर्षात या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून निधीअभावी काम रखडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेंटरकडे विशेषत्वाने लक्ष देत येथील कामाला गती देण्यासाठी निधीचा मार्ग मोकळा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे नागपूरसह संपूर्ण देशातील विद्यार्थी लवकरच या सेंटरमधून आपल्या स्वप्नांची भरारी घेउ शकतील, असा विश्वासही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला आहे.
सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी उपसमिती गठीत करण्याचा निर्णय
या सर्व विकास कामांच्या सोबतच सामाजिक प्रश्नांकडेही तळमळीने लक्ष देत त्यात महत्वाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सफाई कामगारांच्या वारसास लाड समितीने केलेल्या शिफारशीनुसार नियुक्ती देणे यासोबतच सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एक विशेष उपसमिती गठीत करण्याबाबत महत्वाचे पाउल देवेंद्र फडणवीस यांनी उचलले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत असलेल्या या उपसमितीमध्ये वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, त्याच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांच्या जीवनात आनंदाची रुजवात व्हावी यासाठी तळमळीने काम करण्यासाठी सामाजिक जाणीवांची जाण असणे आवश्यक आहे. ही जाण आज देवेंद्र फडणवीसांमध्ये असणे ही महाराष्ट्रासाठी अहोभाग्याची बाब असल्याचेही ॲड. मेश्राम म्हणाले.