इंदोरा व शांतीनगर यूपीएचसी ला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणिकरण

– महाराष्ट्र राज्यातील ठरले पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या इंदोरा आणि शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी (यूपीएचसी) सर्वाधित गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणिकरण (NQAS) प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मनपाची ही दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र NQAS प्रमाणिकरण प्राप्त केलेले महाराष्ट्रातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने यश प्राप्त केले आहे.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम (NQAS) अंतर्गत प्रमाणित झालेल्या आरोग्य संस्थांचे निकाल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांचेद्वारे जाहीर करण्यात आले. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ८५.२ टक्के तर शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ८३ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील NQAS प्रमाणिकरण मिळविले. एप्रिल २०२३ मध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांचेद्वारे नामनिर्देशित राष्ट्रीय स्तरीय मुल्यांकन अधिकारी यांनी मुल्यांकन केले होते.

राष्ट्रीय स्तरावरील NQAS प्रमाणित झालेले महाराष्ट्रातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून या दोन्ही सस्थांनी मान प्राप्त केलेला आहे. यापूर्वी एकही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे NQAS प्रमाणित झालेले नाही. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे NQAS प्रमाणित झालेले आहेत.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या नेतृत्वातील शहर स्तरीय गुणवत्ता आश्वासन चमूद्वारे २०२० पासून NQAS मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करून सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले.. शहर स्तरीय गुणवत्ता आश्वासन चमू मध्ये डॉ. विजय जोशी, डॉ. सरला लाड, डॉ. अश्विनी निकम, डॉ. राजेश बुरे व निलेश बाभरे यांचा समावेश असून या चमूद्वारे वेळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ. अश्विनी वाघे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य चमूने विशेष प्रयत्न केले. इंदोरा व शांतीनगर दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांच्या अथक प्रयत्नामुळे हा मान प्राप्त झालेला आहे. या यशाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आरोग्य चमूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत्. NQAS मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा देण्याकरिता कटिबद्ध असल्याचे नमूद करीत दोन्ही केंद्रांनी प्राप्त गुणवत्ता टिकवूण ठेवण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे मनपा आयुक्तांनी निर्देशित केले आहे. NQAS तपासणी सूची नुसार १२ थिमेटिक एरिया नुसार अंमलबजावणी केली जाते. ज्यामध्ये माता व बाल संगोपन सेवा, बाह्यरुग्ण सेवा, लसीकरण, बाह्यसत्र, आपात्कालीन व ड्रेसिंग सेवा, कुटुंब कल्याण, प्रयोगशाळा, औषधी, संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच असंसर्गजन्य रोग नियंत्रण आणि सामान्य प्रशासन (ज्यामध्ये इमारत स्थिती, वस्त्र, आहार, रुग्ण कल्याण समिती इत्यादी) यांच्या दिलेल्या पूर्वनिर्धारित निकषानुसार मुल्यांकन केले जाते.

NQAS प्रमाणिकरण हे ३ वर्षाकरिता वैध असेल. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रतिवर्ष २ लक्ष रुपये अनुदान पारितोषिक म्हणून दिले जाते. पहिल्या वर्षीचे अनुदान हे निकालाच्या अनुषंगाने दिले जाते. तर दुस-या आणि तिस-या वर्षातील अनुदान राज्यस्तरीय पुनर्मुल्यांकनामध्ये उत्तीर्ण झाल्यास दिले जाते. मनपाला प्राप्त सदर अनुदान हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना सेवा उपलब्ध करून देणेकरीता वापरण्यात येणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com