नागपूर :- कोविडमध्ये एक पालक गमावलेल्या 11 ते 18 वयोगटातील जिल्ह्यातील 1 हजार 790 मुलांना प्रायोजकत्व योजनेचा लाभ देण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज मंजुरी प्रदान केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात प्रायोजकत्व समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष छाया राऊत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, समिती सदस्य प्रतिमा दिवाणजी, स्वाती महात्मे, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना ढोंबरे यावेळी उपस्थित होते
काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या जिल्ह्यातील 1 हजार 790 बालकांना प्रायोजकत्व योजनेचा लाभ देण्यास समितीने मंजूरी दिली असून या अर्थ सहाय्यातून मुलांचा शैक्षणिक व इतर बाबीवरील खर्च करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रायोजकत्व समिती महिला व बाल विकास विभागाच्या मिशन वात्सल्य योजनेच्या 19 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेली आहे. समितीचे कार्य बालकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात कोविड कालावधीत एक पालक झालेली, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 11 ते 18 वयोगटातील बालकांना प्रायोजकत्व योजनेचा लाभ मिळणार आहे.