संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 13 :- कोरोना काळात फुटपाथ विक्रेत्यांना आधार व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत कामठी शहरात आतापर्यंत 1357 लाभार्थी पात्र ठरले असून यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी उद्या 14 मे ला सायंकाळी साडे चार वाजता मालकी पट्टे वितरण कार्यक्रम अंतर्गत स्वनिधी महोत्सवाचे आयोजन कामठी नगर परिषद प्रांगणात करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार असून प्रमुख उपस्थितीत आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर,खासदार कृपाल तुमाणे, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे ,भाजपा पदाधिकारी अजय अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या पुढाकारातून शहरात कामठी नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणात फुटपाथ विक्रेत्यांना योजनेचा लाभ होऊ शकला आहे.
फुटपाथ विक्रेत्यांना कोरोना काळात आधार व्हावा आणि व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने सहज निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा शुभारंभ केला.त्यानुसार कामठी नगर परिषद मध्ये सन 2020 पासून ही योजना कार्यान्वित आहे .या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना सुरुवातिला 10 हजार रुपये निधी प्राप्त होतो ,लाभार्थ्याने तो निधी प्रमाणिकतेने भरल्यास दुसऱ्या टप्प्यात 20 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्गदर्शनार्थ संबंधित विभागाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले.त्याचाच परिणाम कामठी शहरात या योजने अंतर्गत 2078 लाभार्थ्यांनी कर्ज अर्ज सादर केले त्यातील 1485 अर्ज पात्र करण्यात आले त्यातून 1357 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज मंजूर केले असून 1330 लाभार्थ्याना कर्ज वितरण करण्यात आले आहे.याच लाभार्थ्यापैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या काही लाभार्थ्यांचा सन्मान उद्या 14 मे ला आयोजित मालकी पट्टे वितरण व स्वनिधी महोत्सव कार्यक्रमात केला जाणार आहे.तेव्हा या कार्यक्रमात नगर परिषद क्षेत्रातील समस्त नागरिकांसह पथविक्रेत्यांनीहीन उपस्थित राहण्याचे आवाहन दीनदयाळ अंत्योदय योजनेचे अधिकारी विशाल गजभिये,प्रदीप तांबे तसेच सुनीता सोंनभद्रे यांनी केले आहे.