‘सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर :- आजचे धावपळीचे जीवन सुखकर करण्यासाठी महिला बचत गटांची उत्पादने सर्वांना उपयुक्त ठरत आहे. सरस प्रदर्शनात त्यांची ही उत्पादने खरेदी करून नागपूरकरांनी बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी आज केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शन व विक्री, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे दिनांक 24 ते 26 मार्चपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, समाजकल्याण सभापती मिलींद सुटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपायुक्त विवेक इलमे व कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, रश्मी बर्वे, पुनम गाला यावेळी उपस्थित होते.
सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटाद्वारे निर्मित उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. बचतगटांनी गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादनासोबतच त्याचे पॅकेजिंग व मार्केटींगकडेही विशेष लक्ष देण्याचे कोकड्डे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपायुक्त विवेक इलमे व उपायुक्त कमलकिशोर फुटाणे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यात उमेदअंतर्गत 19 हजार 318 बचत गट असून त्यात दोन लाख महिलांचा समावेश आहे. बचत गटाच्या या महिलांना त्यांची उत्पादने विक्रीसाठी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 68 स्टॉल लावण्यात आले असून तेथे बचत गटाच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेद्वारे बचत गटांच्या उत्पादनासाठी ‘नागरत्न’ या ब्रँड चे पेटेंट नोंदणी करण्यात आले असून प्रदर्शनातील सर्व उत्पादने या ब्रँडच्या नावाने विक्री करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी भिवापुरी मिरची पावडर या महिला बचत गटाच्या उत्पादनाचे लेबलिंग व पॅकेजिंग करून मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शेखर गजभिये यांनी केले.
प्रदर्शनात बचत गटांचे 68 स्टॉल लावण्यात आले असून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत राहणार आहे. याठिकाणी दररोज सायंकाळी गायन, विविध समूह नृत्य, एकल नृत्य, आदिवासी नृत्य अशा विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिला सदस्य तसेच प्रदर्शनाला भेट द्यायला आलेले नागरिक उपस्थित होते.