नागपूर :- केंद्रीय मंत्री ) नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिल्हा आंतरक्लब व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये युथ स्पोर्ट्स काटोल संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. काटोल येथील युथ स्पोर्ट्सने पुरुष आणि १८ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात प्रतिस्पर्धींना नमवून विजेतेपद पटकाविले. व्हिनस मैदान रेशीमबाग येथे ही स्पर्धा पार पडली.
पुरुष गटातील अंतिम सामना युथ स्पोर्ट्स काटोल विरुद्ध मध्य रेल्वे नागपूर यांच्यात झाला. यामध्ये युथ स्पोर्ट्सने २५-१३, २५-१७, २५-२० ने रेल्वेला पराभवाचा धक्का देत विजय मिळविला. पुरुषांच्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये नागपूर पोलिस संघाने व्हिनस स्पोर्ट्स असोसिएशनचा पराभव केला. नागपूर पोलिस ने २५-२२, २५-२० ने सामना जिंकत तिसरे स्थान पटकाविले.
महिला गटातील अंतिम लढतीत कोलबास्वामी धापेवाडा संघाने समर्थ व्यायामशाळा संघाचा पराभव केला. अंतिम सामना २५-१६, २५-१५ ने जिंकून कोलबास्वामी संघाच्या मुलींनी विजेतेपदाचे चषक उंचावले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये रघुजीनगर क्रीडा मंडळ संघाने व्हिनस स्पोर्ट्स असोसिएशनचा २५-१८, २०-२५, १५-१० ने पराभव करीत तिसरे स्थान पटकाविले.
१८ वर्षाखालील मुलांची अंतिम लढत व्हिनस स्पोर्ट्स असोसिएशन विरुद्ध रघुजीनगर क्रीडा मंडळ यांच्यात झाली. हा सामना २५-२०, २६-२४ ने जिंकून व्हिनस ने विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये सूर्योदय क्लब काटोल संघाने उडान क्लब कळमेश्वर ला २५-२३, २५-२२ ने पराभवाचा धक्का देत तिसरे स्थान पटकाविले.
१८ वर्षाखालील मुलींच्या अंतिम लढतीत युथ स्पोर्ट्स काटोलने बाजी मारली. प्रतिस्पर्धी व्हिनस स्पोर्ट्स असोसिएशनचा १८-२५, २५-१६, २५-२२ ने पराभव करुन युथ स्पोर्ट्सने विजेतेपदावर मोहोर उमटविली. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत उडान क्लब कळमेश्वर संघाने रघुजीनगर क्रीडा मंडळचा पराभव केला. उडान क्लब ने २५-१८, २५-२० ने सामना जिंकत तिसरे स्थान पटकाविले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी माजी नगरसेवक विजय (पिंटू) झलके, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक सुनील मानेकर, नितीन कानोडे, सौरभ रोकडे आदी उपस्थित होते.