Ø विभागस्तरीय युवा महोत्सव उत्साहात
Ø 250 स्पर्धक सहभागी
नागपूर :- युवकांनी परिस्थितीशी सामना करुन आपले अस्तित्व सिध्द करावे व आपल्या मातीशी जोडून रहावे. हायब्रीड बियाणांच्या वापरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून द्यावे व त्याचा वापर लहानांपासून मोठ्यांनी करुन आपले आरोग्य जपावे. युवांनी प्रेरणा घेवून शेतीमध्ये सेंद्रिय बियाणांचा वापर करावा, असे उद्घाटनपर भाषणात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आवाहन केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून २०२३-२४ हे वर्ष घोषीत केलेले असून राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित विभागस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 5 डिसेंबरला विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे हस्ते करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालय अंतर्गत या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील अध्यक्षस्थानी होते तर विभागीय कृषी अधिक्षक मिलींद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, जिल्हा क्रीडा अधिकारी, पल्लवी धात्रक, ज्येष्ठ साहित्यिक विजयाताई मारोतकर, आर्ट अॅन्ड कल्चरल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र हरिदास व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी संजय दुधे, जिल्हा युवा पुरस्कारार्थी जयंत दुबळे, परिक्षक उपस्थित होते.
शेखर पाटील यांनी युवकानी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून आपले घ्येय निश्चित करुन आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावे, असे मनोगत व्यक्त केले. पुणे येथे 21 व 22 डिसेंबरला होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेकरीता नागपूर विभागातील जास्तीतजास्त कलाकारांनी महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळवावे अश्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या महोत्सवामध्ये नागपूर विभागातील 15 ते 29 वयोगटातील वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर या सहा जिल्हयातील एकूण 250 स्पर्धकानी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी तर सूत्रसंचलन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले व उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नटराज आर्ट अॅन्ड कल्चरल सेंटर, नागपूर व मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यानंतर या महोत्सवाचा समारोप व बक्षीस समारंभ घेण्यात आला. विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.