सेवा केंद्रांचा आढावा
नागपूर : जिल्ह्यातील शासकीय कामकाजाचे ऑनलाईन कामकाज आपले सेवा केंद्रातून चालते, नागरिकांना सुलभरित्या विविध कामाच्या सेवा नजिकच्या सेवा केंद्रात मिळाव्या हा उद्देश शासनाचा आहे. परंतु या सेवा केंद्रात अतिरिक्त शुल्क घेऊन काम करावे लागते, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करुन अतिरिक्त शुल्क सेवा केंद्रांनी घेऊ नये व घेतल्यास तशा प्रकारचे देयक नागरिकांना द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या.
जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, मिनल कळसकर तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
सेवा केंद्रात अवाजवी दर घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहेत, याबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यातील सेवा केंद्रास भेट देवून तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कागदपत्र तपासणी, स्कॅनिंग, टायपिंग व इतर बाबींकरीता अतिरिक्त दर असल्यास त्याबाबत देयकात नमूद करावे.
त्यासोबतच अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना योग्य माहिती द्यावी. सेवा केंद्र धारक नागरिकांना योग्य सेवा देत नाहीत, त्यामुळे विनाकारण नागरिकांना त्रास होत आहे. यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गैरकृत्य आढल्यास त्याबाबत शासनाकडे शिफारस करुन सेवा केंद्र बंद करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
आपले सरकार सेवा केंद्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. योग्य सेवा देणे त्यांचे कर्तव्य आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे,अशा सूचना त्यांनी सेवा केंद्र धारकांना केल्या.
महाऑनलाईन पोर्टल विषयी काही अडचणी असल्यास देवेंद्र निलकूटे devendra.nilkute@
रेशन कार्ड, जातीचे दाखले, ऑनलाईन फार्म, ॲपडेव्हिट आदी कामांसाठी नागरिक केंद्रावर येतात. त्यांना योग्य दराने सेवा देण्यात याव्यात, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी सेवा केंद्र धारकांनी कामात येणाऱ्या अडचणी विषयी निवेदन सादर केले. सेवांचे दरपत्रक सेवा केंद्राबाहेर व आतमध्ये लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सेवा केंद्र धारकांच्या अडचणीवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. यावेळी आपले सेवा केंद्राचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.