Ø ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना
Ø प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन
यवतमाळ :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शनात तब्बल ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यात ६० स्टॉल्स विविध हस्तकला आणि उत्पादनांसाठी, तर १५ स्टॉल्स पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या प्रदर्शनास यवतमाळकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
समृद्धी मिनी सरस प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहेत. हस्तकला व गृहउद्योग उत्पादनांमध्ये पापड, कुरड्या, पौष्टिक तृणधान्य पीठ, रोपवाटीका, लाकडी फर्निचर, चिनी मातीच्या मुर्त्या, सेंद्रिय उत्पादने, धूप अगरबत्ती, द्रोण-पातरवळी, महिला साहित्यिकांची पुस्तके, महापुरुषांच्या प्रतिमा प्रदर्शनीत विक्रीस उपलब्ध आहे.
खाद्य पदार्थ्यांमध्ये चिकन, मटन, खेकडा कढी, अंडाकरी, झुणका-भाकर, तंदूर रोटी, मिसळ, डाळ फ्राय, तडका वरण, गुपचूप (पाणीपुरी), बेसन पदार्थ, सेंद्रिय तृणधान्य आणि मसाले पदार्थांमध्ये हळद, मिरची, टोमॅटो, आंबा, लिंबू, आवळा यांचे लोणचे, ज्वारी आणि बाजरीपासून तयार पदार्थ येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यास यवतमाळकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
प्रदर्शनाच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सामुहिक, एकल नृत्य, गीत गायन आयोजित करण्यात आलेले होते. त्या करिता विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आलेला होता. त्या करिता यवतमाळ येथील रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉक्टर मिर्झा बेग यांचा मिर्झा एक्स्प्रेस व चला हवा येऊ द्या फेम प्रवीण तिखे आणि येथील सुप्रसिद्ध कवी जयंत चावरे यांचे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीला प्रदर्शनीत प्रचंड मागणी आहे. ग्रामीण महिलांच्या हातची अंडाकरी, आणि खेकडा कडीला चविष्ट प्रतिसाद लाभत आहे. घरगुती मसाले, लोणची आणि हस्तकला वस्तू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. समृद्धी मिनी सरस प्रदर्शन ग्रामीण महिलांसाठी फक्त व्यवसायाचे नव्हे तर आर्थिक सशक्तीकरणाचे मोठे व्यासपीठ ठरत आहे. गावखेड्यातील लघुउद्योगांना शहरी बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सदर प्रदर्शन दि.5 फेब्रुवारी पर्यंत सुरु असून मोठ्या प्रमाणात यवतमाळकरांनी भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.