संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. निशांत माटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, प्रा. उज्ज्वला सुखदेवे मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. निशांत माटे म्हणाले, लोकसंख्या वाढ ही भारतापुढे सर्वात मोठी समस्या आहे. लोकसंख्या वाढीमुळे देशातील उपलब्ध संसाधनावर ताण वाढलेला असून बेरोजगारी, दारिद्र्य, अनारोग्य, शिक्षणाचा अभाव इत्यादी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशातील युवा पिढी निराशेच्या गर्तेत चाललेली आहे. देशातील विद्यमान सरकार देशाला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविते, परंतु त्यासाठी धोरणात्मक कृती कार्यक्रम राबविताना दिसत नाही. लोकसंख्या वाढीसारख्या गंभीर विषयावर वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या इत्यादी ठिकाणी कुठलीही चर्चा नाही. सध्या देशातील विविध पक्ष सत्तेसाठी हपापलेले असून, धर्मांधतेचे आणि जातीयतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, लोकसंख्या वाढीवरही परिणाम झाला आहे. संविधानाला अभिप्रेत असलेल्या प्रत्येक मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी देशाकडे प्रभावी उपाय योजना नाहीत. विकासाचा फक्त आभास निर्माण केला जात आहे. मानवाच्या बौद्धिक संसाधनाचा योग्य वापर होत नाही माणूस फक्त ग्राहक झालेला आहे. त्यामुळे भारत देश हा एक बाजारपेठ झालेली आहे. लोकसंख्या नियंत्रणात देश अपयशी ठरला ही खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. रुबीना अन्सारी यांनी अध्यक्षीय भाषणातून वाढती लोकसंख्या आणि देशापुढील आव्हाने या विषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले, संचालन प्रा. उज्ज्वला सुखदेवे यांनी केले, तर डॉ. मनीष मुडे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ.मनोज होले, डॉ. सविता चिवंडे, प्रा. शशिकांत डांगे, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे,गजानन कारमोरे,शशील बोरकर, वसंता तांबडे, नीरज वालदे, राहुल पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.