मुंबई :- भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश निवडणूक व्यवस्थापन व न्यायिक प्रक्रिया विभागाच्या वतीने गुरुवारी भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रदेश संयोजक आ.प्रवीण दरेकर यांनी केले. निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आ.श्रीकांत भारतीय यांनी या कार्यशाळेचा समारोप केला. यावेळी विधी विभाग प्रदेश संयोजक अॅड.अखिलेश चौबे, सह संयोजक अॅड.शहाजी शिंदे, अॅड.विनायक वाजपेयी आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड.चौबे यांनी उपस्थित संयोजक व सह संयोजकांना आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीसंदर्भात पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. निवडणूक अर्ज भरण्यापासून ते मतदान संपेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रीये दरम्यान आवश्यक असलेली कायदे विषयक माहिती दिली.
उमेदवाराच्या प्रचार मोहीमेसाठी घ्यावयाच्या विविध परवानग्या, उमेदवाराचा खर्च व निवडणुकीनंतरच्या कायदेशीर बाबींची पूर्तता कशी करावयाची याबाबतही श्री.चौबे यांनी विस्ताराने मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक व्यवस्थापन व न्यायिक विभागातर्फे कायदेशीर बाबींची इत्थंभूत माहिती देणारे हँडबूक तयार करण्यात आले आहे. या पुस्तिकेचे उपस्थितांना वितरण करण्यात आले.
या कार्यशाळेत निवडणूक व्यवस्थापन समितीचे सह संयोजक संदीप लेले यांनी उपस्थितांना निवडणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा समारोप करताना आ.श्रीकांत भारतीय यांनी संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान काय खबरदारी घ्यायची हे विशद केले. भाजप कार्यकर्त्यांनी कायद्याचे, नियमांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तांत्रिक, कायदेशीर चुकांकडे बारकाईने लक्ष देऊन त्या चुका संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे भारतीय यांनी सांगितले.